सिलेंडर डोक्यात घालून मित्राचा खून करणाऱ्याला अटक; पिंपरी पोलिसांची कारवाई

जीवन मागील ९ महिन्यांपासून राहुल भालेकर यांच्या त्रिवेणीनगर येथील अपार्टमेंटमध्ये हाऊसकिपिंगचे काम करत होता. १७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ते १८ डिसेंबर रोजी दुपारे साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी त्याचा खून केल्याची फिर्याद चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

पिंपरी: हाऊसकिपींगचे काम करणारा मित्र त्याच्या मित्राला ‘इथून निघून जा’ असे म्हटला. त्यावरुन चिडलेल्या मित्राने हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या मित्राच्या डोक्यात लहान सिलेंडरची टाकी मारुन त्याचा खून केला. त्यानंतर बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला वासोली फाट्याजवळून अटक केली. त्रिवेणीनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा खून केल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. त्या गुन्ह्यातील आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली. रंजेश कुमार रामपरवेश राम (वय २२, रा. वराळे गाव, चाकण. मूळ रा. जामापूर, ता. जि. शिवान, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जीवन नंदलाल शर्मा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत राहुल ज्ञानेश्वर भालेकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, जीवन मागील ९ महिन्यांपासून राहुल भालेकर यांच्या त्रिवेणीनगर येथील अपार्टमेंटमध्ये हाऊसकिपिंगचे काम करत होता. १७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ते १८ डिसेंबर रोजी दुपारे साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी त्याचा खून केल्याची फिर्याद चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मयत जीवन याच्याबाबत तपास केला असता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर, त्याचे वाद, भांडण याबाबत माहिती काढली.

चिखली पोलिसांनी चार पथके तयार केली. एका पथक सीसीटीव्ही फुटेज पाहणीसाठी, एक पथक जीवनची माहिती काढण्यासाठी, एक पथक तांत्रिक विश्लेषणासाठी तर एक पथक रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड इत्यादी ठिकाणी रवाना करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सुमारे १२५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपी रंजेशकुमार राम याची ओळख पटवली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा ठावठिकाणा शोधला आणि वासोली फाट्याजवळ कामगारांच्या खोलीतून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी रंजेशकुमार हा बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी रंजेशकुमार आणि त्याचा मित्र तिलक बास्कोटा भोसरी, म्हाळूंगे परिसरात एकत्र काम करत होते. बास्कोटा हा मयत जीवन शर्माचा मित्र होता. रंजेशकुमार आणि बास्कोटा यांचे काही दिवसांपूर्वी काम सुटले. त्यांना आर्थिक चणचण भासू लागल्याने तसेच कर्ज झाल्याने दोघेजण जीवन शर्मा काम करत असलेल्या ठिकाणी राहण्यासाठी आले. तिथून ते दोघे राजस्थान येथे कामासाठी जाणार होते. दरम्यान रूमभाडे देण्यासाठी पैसे नसल्याने रंजेशकुमार याने त्याच्या बहिणीकडून बास्कोटा याच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये मागवून घेतले.

बास्कोटा याच्या बँक खात्यावर पैसे आल्यानंतर बास्कोटा आणि जीवन यांनी त्यातील अडीच हजार रुपये रंजेशच्या परस्पर काढून घेतले. राहिलेले ५०० रुपये रंजेशकुमार याला काढून आणण्यास सांगितले. राहिलेले ५०० रुपये घेऊन जीवन काम करत असलेल्या ठिकाणची रूम सोडून निघून जाण्यास जीवनने सांगितले. त्याचा राग आल्याने रंजेशकुमार याने १७ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता जीवन सोबत वाद घालून त्याच्या डोक्यात लहान सिलेंडरची टाकी मारून त्याचा खून केला, असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप भोसले, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, संदेश इंगळे, पोलीस कर्मचारी सुनील शिंदे, आनंद चव्हाण, किसन वडेकर, बाबा गर्जे, चेतन सावंत, विश्वास नाणेकर, विपुल होले, संतोष सपकाळ, कबीर पिंजारी, सचिन नलावडे यांनी केली