प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

दरोडेखोरांनी हातामध्ये चाकू, कटावणीसह प्रवेश करून सिक्युरिटी गार्डना चाकूचा धाक दाखविला आणि तोंडावर मिरची पुड टाकून मारहाण करत त्याला दाबूना अंगावर चादर टाकून डांबून ठेवले. दरोडेखोरांनी कंपनीमधील तांबे, पितळ या धातुचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग, हार्नेस असे स्पेअर पार्ट आणि सिक्युरिटी गार्डचे तिन मोबाईल फोन, असा एकूण २५ लाख ८७ हजार २४७ रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लुटून नेला

    पिंपरी: सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवून तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून कंपनीत दरोडा घालणाऱ्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरलेले साहित्य विक्रीसाठी आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी नऊ जणांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. अटक आरोपींकडून ३३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    रोहन विजय सूर्यवंशी (वय २८, रा. कासारवाडी), राहुल अंकुश क्षीरसागर (वय २१, रा. काळा खडक वाकड), रतन महादेव दनाने (वय१९, रा. तळेगाव दाभाडे), अन्सार जुल्फीकार खान ( वय २५, रा. दापोडी), अब्दुल सत्तार करिम (वय२३, रा. दापोडी), अरबाज रईस शेख (वय २०, रा. दापोडी), मीना अंकुश क्षीरसागर (वय ४०, रा. काळा खडक, वाकड), अर्जुन मोहनलाल भट (वय २४, रा. चिखली), विद्या मनोज मगर (वय २३, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किरण गिरी, हर्षद खान हे दोघेजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या कालावधीत आरोपींनी कुरुळी येथील व्ही.टेक इंडस्ट्रीज इंडीया प्रा. लि. या कंपनीच्या कंपाऊंड वॉलवरुन कंपनीच्या आवारात प्रवेश केला. दरोडेखोरांनी हातामध्ये चाकू, कटावणीसह प्रवेश करून सिक्युरिटी गार्डना चाकूचा धाक दाखविला आणि तोंडावर मिरची पुड टाकून मारहाण करत त्याला दाबूना अंगावर चादर टाकून डांबून ठेवले. दरोडेखोरांनी कंपनीमधील तांबे, पितळ या धातुचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग, हार्नेस असे स्पेअर पार्ट आणि सिक्युरिटी गार्डचे तिन मोबाईल फोन, असा एकूण २५ लाख ८७ हजार २४७ रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लुटून नेला. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

    घटनेची माहिती म्हाळुंगे पोलिसांना माहिती झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तीन पथके तयार केली. तिन्ही पथकांनी आरोपींचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध सुरू केला. दरोडेखोरांनी चोरलेला माल एका टेम्पोमधून नेला असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी टेम्पो मालकाची माहिती काढली. टेम्पो मालक आणि खब-यांकडून म्हाळुंगे पोलिसांना माहिती मिळाली की, दरोडेखोर लुटलेला माल विकण्यासाठी यमुनानगर निगडी येथे गेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी यमुनानगर परिसरात सापळा लावला. लुटलेला माल एका ट्रान्सपोर्ट गोडाऊनमध्ये विकत असताना पोलिसांनी आरोपींची रंगेहाथ धरपकड केली. दरम्यान आरोपी आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत दोन आरोपी पळून गेले. पोलिसांनी नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये दोन महिला दरोडेखोरांचा सहभाग आहे.
    २५ लाख ७५ हजार ५४७ रुपयांचे तांबे-पितळ या धातुचे स्पेअर पार्ट, चार लाख रुपये किमतीचा टेम्पो (एम एच १४ / जी डी ७८२७), दोन लाख ९० हजारांच्या तीन दुचाकी, ६७ हजारांचे सात मोबाईल फोन, सुरक्षा रक्षकाचा काढून घेतलेला १५०० रुपयांचा एक मोबाईल, ६५० रुपयांचे कटावणी, चाकू, मिरची पूड, असा एकूण ३३ लाख ३४ हजार ६९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.