नीरा -भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे सपकळवाडीत काम बंद पाडण्याचा प्रयत्न ; घराला तडे गेल्याने ग्रामस्थ आक्रमक

भुसुरुंगाच्या स्फोटांच्या तीव्रतेमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. दररोजच्या हादऱ्यांमुळे त्यामध्ये वाढ होत आहे.स्फोटाची तीव्रता रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात असते. त्यामुळे झोपेत असणा-या लोकांच्या अंगावर तडे गेलेल्या भिंती,घरातील वस्तु पडुन जिवितहानी होण्याचा धोका आहे, असे सपकळवाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

इंदापूर: निरा भीमा स्थिरीकरण योजनेतील नदीजोड बोगद्याच्या कामामुळे होत असणाऱ्या घरे व शेतीच्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी सणसर गावच्या हद्दीतील सपकळवाडी येथे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रविवारी (दि.२०) सायंकाळी ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सविस्तर वृत्त असे की, निरा भिमा स्थिरीकरण प्रकल्पातील नदीजोड बोगदा जमिनीपासून १०० ते ११० फुट खालून घेतला जात आहे.बोगद्याच्या कामासाठी पाटबंधारे विभागाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेचे भुसुंरुग लावण्यात येत आहेत. भुसुरुंगाच्या स्फोटामुळे बोगद्याच्या एक किलोमीटर परीघातील भुजल पातळी खालवलेली आहे.विहीरी, विंधनविहिरी,हातपंपांचे पाणी आटले आहे.काही विहिरींचे पाणी गायब झाले आहे.यामुळे शेती व शेतीपुरक व्यवसाय अडचणीत आले आहेत.सुपीक जमिनी ओस पडण्याच्या मार्गावर आहेत.

भुसुरुंगाच्या स्फोटांच्या तीव्रतेमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. दररोजच्या हादऱ्यांमुळे त्यामध्ये वाढ होत आहे.स्फोटाची तीव्रता रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात असते. त्यामुळे झोपेत असणा-या लोकांच्या अंगावर तडे गेलेल्या भिंती,घरातील वस्तु पडुन जिवितहानी होण्याचा धोका आहे, असे सपकळवाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घरे,शेती व शेती पूरक व्यवसायांच्या होणाऱ्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात यावे.त्यानूसार भरपाई मिळावी. बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखले मिळावेत. शेतकऱ्यांना नीरा डावा कालव्यातुन कायमस्वरूपी पाणी परवानगी मिळावी.सदर कामाचा खर्च सरकार किंवा संबंधित ठेकेदारामार्फत करून देण्यात यावा,अश्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत.
सद्यपरिस्थिती व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सपकळवाडी येथे शेतकऱ्यांनी बोगद्याचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचे काम सुरु करुन देणार असल्याचा इशारा सपकळवाडीचे माजी सरपंच सचिन सपकळ यांनी दिला आहे. दरम्यान,नुकसान झालेल्या घरांचे व विहिरींचे पंचानामे करुन शासकीय नियमाप्रमाणे भरपाई देणार असल्याची माहिती नीरा-भीमा स्थिरीकरण नदीजोड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे यांनी दिली आहे.

सपकळवाडी गावाजवळील शॉप्ट क्रमांक १ पासून २९० मीटर लांबीमध्ये दोन्ही बाजूला काम सुरु आहे.त्या परीसरात ३५० कामगार बोगद्यासाठी काम करत आहेत.कोणती ही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांनी जनरेटर व काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुमारे ४० कामगार जमिनीपासून ५० मीटर खाेल अंतरावर बोगद्यामध्ये काम करीत होते.जनरेटर बंद झाला असता तर सर्व काम ठप्प झाले असते. कामगारांना ऑक्सिजनही मिळण्यास अडचण झाली असती.कामगारांच्या जीवीताला धोका निर्माण होवू शकला असता.

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नीरा नदीचे पाणी २३ किमी लांब बोगद्याद्वारे व उघड्या कालव्याद्वारे उजनी धरणात टाकण्यात येणार आहे.त्यानंतर ते मराठवाड्यात नेण्यात येणार आहे.  मराठवाड्याला नीरा नदीमधून पाणी देण्यासाठी तावशी ते भादलवाडी दरम्यान जमिनीखालून बोगदा खोदण्याचे काम सुरु आहे.बोगद्याचे १४ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.७.२४ किलोमीटर अंतरामध्ये उर्वरित बोगद्याचे काम होणार आहे.