बनावट फेसबुक अकाऊंटवरून होतेय पैश्यांची मागणी ; दक्षता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

सायबर चोरटे तुमचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात. त्यावरुन तुमच्या मित्रांना ते फ्रेंड सिक्वेस्ट पाठवितात. त्यांनी ती एक्सेप्ट केली की, त्यांना आई, वडिल आजारी आहेत. अडचणीत सापडलो आहोत़ परदेशात अडकलो आहोत, तेथून पैसे काढता येत नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून तुमच्याकडे पैशांची मागणी केली जाते.

    पुणे: शहरात सायबर गुन्ह्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नव्या वर्षातील पहिल्या अडीच महिन्यात अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या तब्बल २२० अर्ज सायबर पोलिसांकडे आले आहेत. एखाद्या व्यक्तीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यांच्या संबंधित मित्रांना पाठवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार वाढला आहे. अशाप्रकारचा कोणताही मेसेज आलास खात्री करून संबंधितांशी थेट संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरपर्यंत अशा १४० तक्रारीच्या तुलनेत यंदा यात अधिक वाढ झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

    आपण वेगवेगळ्या साईटवर आपले फोटो, माहिती अपलोड करत असतो. त्या फोटो आणि माहितीचा उपयोग करुन सायबर चोरटे तुमचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात. त्यावरुन तुमच्या मित्रांना ते फ्रेंड सिक्वेस्ट पाठवितात. त्यांनी ती एक्सेप्ट केली की, त्यांना आई, वडिल आजारी आहेत. अडचणीत सापडलो आहोत़ परदेशात अडकलो आहोत, तेथून पैसे काढता येत नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून तुमच्याकडे पैशांची मागणी केली जाते. वर भारतात परत आल्यावर तुमचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन भावनिक आवाहन केले जाते. त्यामुळे अडचणीत असलेल्या मित्राला मदत करण्याच्या भावनेतून तुम्ही त्याने सांगितलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करतात. नंतर कधी तरी ते मित्राचे बनावट अकाऊंट असल्याचे समजते. तोपर्यंत मध्ये बराच काळ गेलेला असतो. अशा प्रकारे फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.