भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ आता ऑडिओ स्वरूपात; दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या आवाजात येणार ऐकता

सुप्रसिध्द अभिनेते व दिग्दर्शक अतुल पेठे यांनी अतिशय मेहनतीने पस्तीस तासांची'हिंदू जगण्याची समृध्द अडगळ' कादंबरी वाचली आहे. ही स्टोरीटेल अ‍ॅपवर ऐकत असताना एक जिवंत नाट्यानुभव येेतो.

पुणे: ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे यांची बहुचर्चित ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ या कांदबरीला प्रकाशित होऊन दहा वर्षे झाली. त्यानिमित्ताने या कादंबरीवर अनेक ठिकाणी समीक्षात्मक चर्चाही झाली. मोहंजोदडो हडप्पा संस्कृतीपासून आजच्या युगातील खेडेगावापर्यंतचा प्रचंड मोठा कालपट घेऊन भारतात विकसित झालेल्या हिंदू संस्कृतीचा आजचा आपल्या जगण्याशी असणारा संबंध स्पष्ट करणारी ही कादंबरी आहे.खानदेशातील एका खेड्यातील पुरातत्व संशोधक खंडेरावची गोष्ट सांगत असताना हिंदू संस्कृती कशी विकसित होत गेली व ती इथल्या खेडोपाड्यात किती खोलवर रूजली आहे,याचा मागोवा नेमाडे घेतात. हे करताना या कादंबरीतील अनेकविध पात्रे,ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भ,लोकगीते व लोककथा,गावातील व कुटुंबातील माणसांची जगण्याची धडपड,अनेक प्रथा व रूढी आपल्याला समजत जातात.

सुप्रसिध्द अभिनेते व दिग्दर्शक अतुल पेठे यांनी अतिशय मेहनतीने पस्तीस तासांची ही कादंबरी वाचली आहे. ही स्टोरीटेल अ‍ॅपवर ऐकत असताना एक जिवंत नाट्यानुभव येेतो. स्टोरीटेल ही ऑडियोबुक्स क्षेत्रातील अग्रगण्य ऑडिओबुक्स कंपनी असून मराठी,हिंदी,इंग्रजी बरोबरच बंगाली, आसामी, कन्नड, तमिळ, मल्याळम अशा भारतीय भाषांमध्येही हे अ‍ॅप उपलब्ध आहे. हिंदू जगण्याची समृध्द अडगळ ही कादंबरी ‘मराठी’ प्रमाणेच ‘हिंदी’तही स्टोरीटेलवर उपलब्ध आहे. स्टोरीटेल सिलेक्ट मराठी दरमहा फक्त रूपये 99 मध्ये उपलब्ध असून हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर आपल्याला मोबाईलमध्ये हजारो मराठी ऑडिओबुक्स कुठेही,कधीही व कितीही वेळ ऐकता येतात.