हर्षवर्धन पाटलांचे विश्वासू भरत शहा यांचा उमेदवारी अर्ज अखेर दाखल; अप्पासाहेब जगदाळे यांची शिष्टाई यशस्वी

  इंदापूर / शैलेश काटे : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, वजनदार नेते आप्पासाहेब जगदाळे यांची शिष्टाई यशस्वी झाली. अखेर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांचा अत्यंत विश्वासू चेहरा असणाऱ्या माजी संचालक भरत शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (दि.२४) दुपारी अडीच वाजता दाखल केला.

  दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांच्याबाबतच्या शहा कुटुंबियांमध्ये असणाऱ्या निष्ठेमुळे कर्मयोगीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल उभा राहू शकले नाही. निवडणुकीतील त्यांच्या मनसुब्यांचा बुरुज पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शहा व पाटील यांच्यातील कथित दुरावा मिटल्याने आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतच्या मतदारांच्या मनात होवू पाहणाऱ्या संभ्रमाला पूर्णविराम मिळाला आहे.

  सविस्तर हकीकत अशी की, इंदापूरचे शहा घराणे व बावड्याचे पाटील घराणे यांचे अर्धशतकाहून अधिक काळाचे ऋणानुबंध आहेत. दिवंगत शंकरराव पाटील यांचे अत्यंत निकटचे सहकारी असणाऱ्या गोकुळदास शहा यांनी पाटील यांच्या कार्यकाळात त्यांची कधी ही साथ सोडली नाही. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून हे चित्र तसेच कायम होते. मध्यंतरीच्या काळात तात्विक मतभेदांमुळे हर्षवर्धन पाटील व भरत शहा यांचे बंधू तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्यातील अंतर वाढले.

  या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपूर्वी भरत शहा यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष पद, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद व इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवकपद यांचे राजीनामे दिले. याचा फायदा उचलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गोकुळदास शहा यांची भेट घेतली. शहा बंधुंसमवेत चर्चा केली. या चर्चेमुळे हर्षवर्धन पाटील गटामध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

  कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले या हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याच्या चर्चा झडत असतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमवेत भरत शहा यांना आपल्याकडे वळविता आले तर कर्मयोगी सहकारीच्या निवडणुकीत पॅनेल उभा करता येईल, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा होरा होता. मात्र, मुकुंद शहा व भरत शहा यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेना, पद्मा भोसले तर दूरच राहिल्या असा प्रकार होवून बसला.

  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्मयोगी सहकारीची असा पेक्षा ही जास्त पिळवणूक होत असल्याचा वचपा काढत सलग तीन वर्षे ऊस घातला नाहीतर होणा-या परिणामाचा ‘कायदा’ अंमलात आणून हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पुरती कोंडी करुन टाकली. परिणामी, ऐन घटकेला, राष्ट्रवादी काँग्रेसला हाराकिरी करावी लागली. त्यांना पॅनेल उभा करता आले नाही.

  हर्षवर्धन पाटील व शहा बंधूंचे मोबाईलवरून संवाद

  आज सकाळी हर्षवर्धन पाटील व शहा बंधुंचे मोबाईलवरुन बोलणे झाले होते. दहा वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले. या चर्चेवेळी गोकुळदास शहा, मुकुंद शहा, भरत शहा, अंगद शहा, सुनील तळेकर, प्रमोद राऊत, अशोक चव्हाण, गणेश महाजन असे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्वीचे ऋणानुबंध कायम ठेवण्याचा शब्द दोन्ही बाजूंकडून देण्यात आला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली.

  मागील चार महिन्यांच्या काळात मतभेद होवून देखील हर्षवर्धन पाटील यांनी आपला संयम ढळू दिला नाही. अनावश्यक, तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य केली नाहीत. भरत शहा हे माझे सर्वात जवळचे सहकारी आहेत असेच त्यांनी प्रसिध्दी माध्यमांना अनेकदा सांगितले होते.

  या प्रकरणाच्या निमित्ताने एखाद्या कामाची सुरुवात करायची मात्र ते पूर्णत्वापर्यंत नेण्याची इच्छाशक्ती दाखवायची नाही. या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आरंभशूर कार्यपध्दतीचा अनुभव आला. प्रदीप गारटकर यांच्यासारख्या उत्तम संघटन कौशल्य व जीव ओतून काम करण्याची ताकद असणारा भक्कम कार्यकर्ता सोबत असताना शहा कुटुंबियांचे मन वळवण्यात भरणे का कमी पडले, हा आत्ता चर्चेचा विषय ठरत आहे.