पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचा रोष आम्हाला सहन करावा लागत आहे. प्रभागातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका गोरखे यांनी निवेदनातून दिला आहे.

 

पिंपरी: पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० शाहूनगर, म्हाडा, मोरवाडीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे.
या बाबत भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, नंदा करे, कविता जाधव उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग १० मध्ये शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, म्हाडा, दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर, टिपू सुलताननगर हा भाग येतो. मागील दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात मोठ-मोठ्या इमारती आहेत. दाट लोकवस्ती आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचा रोष आम्हाला सहन करावा लागत आहे. प्रभागातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका गोरखे यांनी निवेदनातून दिला आहे.