भाजप गटनेत्याचा खासगी ‘पीए’ स्मार्ट सिटीचा ‘पीआरओ’; जळगाव ‘कनेक्शन’ची चर्चा

निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचा अनुभव आणि पात्रता सर्वात कमी होती. शिवाय निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नाही. तरीही अशा कमी पात्रतेच्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीतील भ्रष्टाचाराच्या सुरस चर्चा सुरु असताना आता नोकर भरती वरुनही स्मार्ट सिटीचे व्यवस्थापन अडचणीत आले आहे. भाजप गटनेते, स्मार्ट सिटीचे संचालक नामदेव ढाके यांचे खासगी स्वीय सहाय्यक स्वयंम अस्वार यांची वर्णी जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पदावर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आयुक्त राजेश पाटील, ढाके आणि पीआरओ यांच्या ‘जळगाव कनेक्शन’ची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘पीआरओ’ नियुक्तीत वशिलेबाजी झाली असून कमी पात्रतेच्या उमेदवाराची निवड झाल्याचा आरोप करत इतर उमेदवारांनी थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालय, राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रारी केल्या आहेत.

    ‘स्मार्ट सिटी’ची मुदत संपत आलेली असताना पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने जनसंपर्क अधिकारी नियुक्तीची जाहिरात ६ जुलै २०२१ प्रसिद्ध केली. या पदभरतीसाठी भाजप गटनेत्याच्या खासगी स्वीय सहाय्यकासह तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यातील दोघांनी नामांकित दैनिकात काम केले आहे. उच्च शैक्षणिक पात्रता असतानाही स्मार्ट सिटीच्या चार सदस्यीय समितीने भाजप गटनेते नामदेव ढाके यांचे खासगी स्वीय सहाय्यक स्वयंम अस्वार यांची ‘पीआरओ’ नियुक्ती केली.यात वशिलेबाजी झाल्याचे वरकरणी दिसून येत आहे. राजेश पाटील, नामदेव ढाके आणि स्वयंम अस्वार तिघेही जळगावचे असल्याने ‘जळगाव कनेक्शन’ची चर्चा रंगली आहे. याच पीआरओंचा सायंकाळी सहानंतर भाजप गटनेते ढाके यांच्या कार्यालयात बिनदिक्कत वावर असल्याने त्यावर शिक्कामोर्तब होत आहे.

    पीआरओ निवडीबाबत किंवा या प्रक्रियेच्या निकालाबाबत संकेतस्थळावर कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ही पदभरती संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे अथवा नाही याबाबत संशय निर्माण होत आहे. पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्यावर त्यांनी निवडीत वशिलेबाजी झाल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालयाकडेही तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारामुळे चर्चेत असलेला स्मार्ट सिटीचा कारभार आता नोकरभरतीतील ‘वशिलेबाजी’मुळेही चर्चेत आला आहे.

    पात्र उमेदवार व्यंकटेश कल्याणकर यांनी सांगितले की, पीआरओ पदासाठी माझ्यासह  दुसऱ्या एक महिला उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होत्या. मुलाखतीनंतर कमी पात्रतेच्या एका उमेदवाराची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचा अनुभव आणि पात्रता सर्वात कमी होती. शिवाय निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नाही. तरीही अशा कमी पात्रतेच्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवाराची आणि मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या इतर पात्र उमेदवारांची शैक्षणिक पात्रता तसेच अनुभव यांची पुन्हा नव्याने निष्पक्षपणे तपासणी करण्याची मागणी सीईओ, राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.