जिल्हाधिकारी अजून गप्प का?; चित्रा वाघ यांचा सवाल

गावच्या सरपंचावर हल्ला झाल्यानंतर बीडीओंची भूमिका काय, प्रांत अधिकारी, कलेक्टर, जिल्हा परिषद सीईओंची भूमिका काय? अजूनही कोणी दखल घेतली नाही.

    लोणी काळभोर : कदमावक वस्तीच्या (ता. हवेली) महिला सरपंच गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महिला सरपंच गौरी गायकवाड यांची भेट घेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच या प्रकरणावर अद्याप सरकारकडून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. तसेच जिल्हाधिकारी अजून गप्प का आहेत, असा सवालाही त्यांनी उपस्थित केला.

    मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे

    भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी रविवारी दुपारी  भेट घेतली. यावेळी वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणात उत्तर देण्याची मागणी केली. वाघ म्हणाल्या, एका महिलेला मारहाण होताना सत्ताधारी पक्षातील एकही जण याची दखल घेत नाही. तसेच प्रशासकीय सेवेतील एकाही अधिकाऱ्याने या महिला सरपंचांना फोन करुन घटनेची माहिती घेतली नाही. हे सरकार पक्षातील आमदारांना वाचवण्यासाठी काम करत आहे का? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.

    ग्रामविकास मंत्र्यांकडूनही दाखल नाही

    त्या पुढे म्हणाल्या, गावच्या सरपंचावर हल्ला झाल्यानंतर बीडीओंची भूमिका काय, प्रांत अधिकारी, कलेक्टर, जिल्हा परिषद सीईओंची भूमिका काय? अजूनही कोणी दखल घेतली नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील खात्यातील सरपंचाची दखल घेतली नाही. तुम्ही कोणाच्या शपथा घेऊन काम करत आहात, असेही वाघ यांनी म्हटले आहे.