Devendra-Fadvanis

पुणे : “शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत  अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजपने राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसेच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचे महत्व पटवून देण्यासाठी पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले की, “मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनी अभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागता येणार आहे, हे या कायद्यात आहे.  हमीभाव (एमएसपी) कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त होणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटे सांगत आहेत”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

“शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असो वा सुल्तानी, मोदी सरकार कायम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे. आमचे सरकार असतानाही (फडणवीस सरकार) आम्ही कायम शेतकरी हिताची भूमिका घेतली. मात्र, ठाकरे सरकारला शेतकऱ्यांना काही देणे घेणे नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोठ्या उत्साहात त्यांना मदतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात सरकारने मदत दिली नाही अशी टिका त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकरने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे या सरकारने नियम बदलल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता मदत मिळत नाही. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, तेव्हा २५ हजारी हेक्टरी द्या असे म्हटले होते. मात्र, देण्याची वेळ आली तेव्हा ८ हजार दिले, ही दुट्टपीपणाची भूमिका आहे”, असे फडणवीस म्हणाले.

देशात कृषी कायद्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. कृषी विधेयकाविरोधात आंदोलन केले जात आहे. या मुद्द्याचं फक्त राजकारण करण्यासाठी फक्त जाणूनबुजून विरोध केला जात आहे, असे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हणाले.