कोरोना काळात पार्कीगच्या नावाखाली भाजपचा लुटीचा डाव; चुकीच्या धोरणांंमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील – संजोग वाघेरे पाटील

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चांगल्या पार्किग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्या ऐवजी नागरिकांवर आर्थिक भार टाकणे गैर आहे.

  पिंपरी: कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदील झालेले आहेत. या परस्थितीत केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उच्चांकी इंधन दरवाढ आणि महागाईने कंबरडे मोडले आहे. याची कोणतीही चिंता न करता पिंपरी-चिंचवडमध्ये या कठीण काळात पार्किग धोरणाच्या नावाखाली पे अँड पार्क करून नागरिकांच्या लुटीचा डाव सत्ताधारी भाजपने आखला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे. त्यांनी पे अँड पार्कचे नियोजन तातडीने थांबविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

  या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने २०१४ पासून आजपर्यंत वेळोवेळी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. कधी नव्हे ते पेट्रोल १०४ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारकडून नागरिकांवर सुरू असलेला हा महागाईचा हा मारा असह्य होत आहे. यात नागरिक सर्वसामान्य नागरिकांना वाहने वापरावीत किंवा नाही, असा प्रश्न पडतो आहे . केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नागरिक त्रस्त असताना पिपंरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपकडून शहरवासीयांच्या खिश्याला कात्री लावणारी धोरणे राबविली जात आहेत.

  अपापारदर्शक, भ्रष्टाचारी कारभारामुळे करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला जात आहे. तरी देखील शहरवासीयांकडून पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा हव्यास भाजपचा सुरू असल्याचे दिसते आहे. त्यासाठी भाजपने शहरात पार्किंग पॉलिसी राबविण्याचा खटाटोप चालवला आहे. या पार्किग पॉलिसीची १ जुलैपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बीआरटीएस विभागामार्फत अंमलबजावणी करण्याची तयारी चालू असल्याचे प्रसारमाध्यमांमधून समजले आहे. शहरातील रस्त्यांची चार भागात विभागणी करून तेथे खासगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट घेणारी एजन्सी सर्व ठिकाणी एक आहे.

  यावरून इंधन दरवाढ, महागाईमुळे बेजार झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून आता वाहने उभी करण्याची पैसे घेऊन एकप्रकारे लुटीचा डाव आखलेला आहे. यासाठी शहरातील वाहतुकीचा शिस्त लावण्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु, या धोरणामागे सत्ताधारी भाजपचा खरा हेतू हा पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचा आहे. सद्यस्थितीत कोरोनासारखे भीषण संकट उभे ठाकलेलेले नागरिकांपुढे रोजी-रोटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधामुळे व्यावसाय, उद्योग-धंदे अडचणीत आले आहेत. लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहेत. या परस्थितीत घराबाहेर पडणा-या नागरिकांकडून वाहन उभे करण्यासाठी पैसे उकळणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने या धोरणाची अंमलबजावणी थांबवावी, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.

  अंमलबजावणी तातडीने थांबवा, अन्यथा आंदोलन

  पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चांगल्या पार्किग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्या ऐवजी नागरिकांवर आर्थिक भार टाकणे गैर आहे. याचा विचार करावा आणि तातडीने या धोरणाची अंमलबजावणी थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने २३ फेब्रुवारी २०२१ रोजी केली होती. या पे अँड पार्कला आम्ही पुन्हा विरोध करत सत्ताधारी व प्रशासनाने या धोरणाची अंमलबजावणी तातडीने थांबवावी आणि पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा द्यावा. तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजोग वाघेरे पाटील यांनी दिला आहे.