समायोजन बदली प्रक्रियेवर सर्व शिक्षक संघटनांचा बहिष्कार

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरु केलेल्या समायोजन बदली प्रकियेवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरु केलेल्या समायोजन बदली प्रकियेवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला.

    समायोजन बदली प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी व पुणे महानगर पालिका व बारामती नगर परिषद वाढीव हद्दीतील ५८६ शिक्षकांना पुणे जिल्हा परिषद येथे बोलविले होते. यावेळी शरदचंद्रजी पवार सभागृहात झालेल्या सहविचार सभेत संपूर्ण समायोजन बदली प्रक्रियेवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरचिटणीस केशवराव जाधव यांनी केली. याबाबतची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.

    सन २०१८ पासून संचमान्यता नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यात किती शिक्षक पदे निर्माण होतात व किती शिक्षक अतिरिक्त ठरतात हे सांगता येत नाही. मुळात संचमान्यता करण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालक यांचा आहे. शिक्षण उपसंचालकांनी संच मान्यता केल्यानंतर त्याप्रमाणे शिक्षक समायोजन करण्याची कार्यवाही जिल्हा परिषद करते. परंतु आज रोजी जिल्हा परिषदेकडे संचमान्यता झाल्याचा कसलाही आदेश नसताना समायोजन करणे बेकायदेशीर ठरते.

    विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता कोणतीही बदली प्रक्रिया ही उन्हाळा सुट्टीत घ्यावी असे शासनाचे निर्देश आहेत. आज रोजी ५८६ शिक्षकांच्या बदल्या केल्यास ७४ शाळात शिक्षण घेणाऱ्या तीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.पुणे महानगर पालिका व बारामती नगर परिषदेकडे आज रोजी संबंधित शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण देण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषद प्रशासन कसलाही पर्यायी व्यवस्था करू शकत नाही.

    अद्याप ७४ शाळा नगरपालिका/महानगर पालिकेत समाविष्ट झाल्याबाबतचे कोणतेही आदेश जिल्हा परिषद प्रशासन दाखवायला तयार नाही.कोरोना संसर्ग चरम बिंदूवर असताना शिक्षक बदल्या कशासाठी या प्रश्नाचे कोणतेही उत्तर जिल्हा परिषद प्रशासनाकडे नाही.

    समायोजन प्रक्रियेत समाविष्ट शिक्षकांपैकी ७० टक्के शिक्षक अपंग,मतिमंद मुलांचे पालक,विधवा,कॅन्सर,हृदयरोग,मूत्रपिंडाचे विकार इत्यादी दुर्धर आजाराने त्रस्त असलेले शिक्षक,वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ शिक्षक आहेत.त्यांची गैरसोय करून जिल्हा परिषद प्रशासन काय साधणार आहे?

    समायोजन करण्यापूर्वी गेली अनेक वर्षे रखडलेली मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती करावी, अशी शिक्षक संघाची आग्रही मागणी आहे. याबाबत राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे असे जिल्हा परिषद प्रशासन सांगते.परंतु कोणताही कायदेशीर आधार नसलेल्या समायोजन बदली प्रक्रियेबाबत राज्य शासनाकडे मार्गदर्शन का मागवत नाही? असा प्रश्न केशवराव जाधव यांनी उपस्थित केला.

    शिक्षक संघटनांनी घातलेला बहिष्कार डावलून जिल्हा परिषद प्रशासनाने समायोजन बदली प्राक्रिया राबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केशवराव जाधव यांनी दिला आहे.