धक्कादायक! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने बिल्डरला मागितली तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी

आरोपीनी आपसात संगणमत करून गूगल प्ले स्टोअर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून तक्रारदार यांना फोन केला. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगितले.

    पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. फेक कॉल अपचा वापर करून खंडणी मागितली आहे. पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

    नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८,  रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८), किरण रामभाऊ काकडे (वय २५), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९ रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४७ वर्षीयबांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होता.

    आरोपीनी आपसात संगणमत करून गूगल प्ले स्टोअर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून तक्रारदार यांना फोन केला. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगितले. हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरामले व इतर नऊ जणांच्या मालकीची गट क्रमांक 85/1, 85/3 व 87 मधील एकूण सहा हेक्टर जमिनी संदर्भातील वाद मिटवून टाका. तसेच गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी दिली. तर २० लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.