गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांसाठी ‘कॉल सेंटर’; फोनद्वारे संपर्क साधता येणार

महापालिका हद्दीत कोरोना संसर्ग तसेच कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या 'ओमायक्रॉन'चा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांवर संस्थात्मक विलगीकरण केंद्र व घरगुती विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

    पिंपरी : महापालिका हद्दीत कोरोना संसर्ग तसेच कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांवर संस्थात्मक विलगीकरण केंद्र व घरगुती विलगीकरणात उपचार सुरू आहेत. या रूग्णांची दिवसातून एकवेळ फोन करून औषधोपचाराची माहिती घेण्यासाठी कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. हे कॉल सेंटर चालविणाऱ्या संस्थेला प्रति कॉलसाठी १३ रूपये देण्यात येणार आहेत.

    पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. तिसरी लाट सदृश्यस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधित रूग्णांवर महापालिका आणि खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या परंतु त्याबाबत साधारण अथवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांवर संस्थात्मक विलगीकरण केंद्र व घरगुती विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

    कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांचे शरीराचे तापमान, हृदयाची गती, झोपेची गुणवत्ता, खोकला, अंगदुखी, श्वास घेण्यास अडचण अशा प्रकारची माहिती संबंधित रूग्णांना रोजच्या रोज दिवसातून एकवेळ फोन उपलब्ध करून घेतली जात होती. ही सर्व माहिती रूग्णांना फोन करून प्राप्त करून घेणे तसेच पुढील उपचारासाठी मदत पुरविण्यासाठी ऑरनेट टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत २९ एप्रिल २०२१ ते २८ जुलै २०२१ या कालावधीत कॉल सेंटर स्थापन करण्यात आले होते. या माहितीनुसार, महापालिका रूग्णालय किंवा कोरोना केअर सेंटर मार्फत रूग्णांवर उपचार करणे शक्य होत होते. या कॉल सेंटरद्वारे रूग्णांना दिवसातून एक वेळा दुरध्वनी करून त्याची आरोग्य विषयक माहिती घेतली जात होती. रूग्णांना आवश्यक ते उपचार अथवा रूग्णालयात दाखल करण्याकरिता मदत करण्यात येत होती. या एका दुरध्वनीकरिता ऑरनेट टेक्नॉलॉजीज् यांना प्रति कॉल १३ रूपये याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला होता.

    साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कामकाजाची निकड व तातडीची बाब विचारात घेऊन कॉल सेंटरचे कामकाज पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. हे कॉल सेंटर सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ७ जानेवारी २०२२ रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार, थेट पद्धतीने ऑरनेट टेक्नॉलॉजीज् यांच्यामार्फत हे कामकाज केले जाणार आहे.

    ८ जानेवारी २०२२ पासून दोन महिने कालावधीकरिता हे कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रति कॉल येणारा खर्च १३ रूपये याप्रमाणे प्रत्यक्ष होणाऱ्या कॉलनुसार खर्च होणार आहे.