रुग्णाला भेटायला आला आणि वाहन चोर झाला ; ऑगस्टपासून तब्बल १३ वाहने चोरली

शहरात वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याअनुषंगाने पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, ससून रुग्णालयातून चोरी झालेल्या एका दुचाकीचा तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पथक करत होते. त्यांनी येथील सीसीटीव्ही तपासले. त्या आधारे परिसरातील एकूण २०० सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यातून चोरटा सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले.

    पुणे : ससून रुग्णालयात रुग्णाला भेटायला आला अन वाहन चोर बनल्याचा एक प्रकार पुणे पोलीसांच्या बंडगार्डन पोलीसांनी उघडकीस आणला आहे. त्याने ऑगस्टपासून तब्बल १३ वाहने चोरल्याचे समोर आले असून, त्याच्याकडून १३ वाहने जप्त देखील करण्यात आली आहेत. अख्तर चांद मुजावर (वय ४४, रा. ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    अख्तर मुळचा कोरेगाव तालुक्यातील बनवाडी गावचा आहे. त्याच्या नातेवाईकाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना पाहण्यासाठी तो इतर नातेवाईकांसोबत आला. परंतु, त्याला ससून रुग्णालयात आल्यानंतर वाहनांची गर्दी दिसली अन त्याने वाहने चोरण्यास सुरूवात केली. त्याने एक वाहन चोरले अन गावाकडे नेहून कवडीमोल भावाने विकली. परंतु, त्यानंतर त्याने सततच वाहने चोरण्यास सुरूवात केली. अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिली.

    शहरात वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याअनुषंगाने पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, ससून रुग्णालयातून चोरी झालेल्या एका दुचाकीचा तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पथक करत होते. त्यांनी येथील सीसीटीव्ही तपासले. त्या आधारे परिसरातील एकूण २०० सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यातून चोरटा सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यानुसार, पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक राहुल पवार व पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्यांची कबूली दिली. त्याच्याकडून पोलीसांनी शहरातील तब्बल १३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. पुण्यासह सातारा जिल्ह्यातील देखील वाहन चोऱ्या त्याच्याकडून उघड झाल्या आहेत.ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहाय्यक निरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक मोहन काळे, सागर घोरपडे व त्यांच्या पथकाने केली आहे.