१४ जणांच्या विरोधात तीन खूनी हल्ला आणि दरोड्याचा गुन्हा दाखल

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करीत फिर्यादी यांचा मुलगा गणेश शिंदे याला लाकडी दांडक्‍याने आणि दगडाने डोक्‍यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

  पिंपरी: पोलिसात तक्रार दिली म्हणून एका तरुणाला, त्याच्या मित्राला आणि बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच वडापावच्या गाडीवर दरोडा टाकून लूट केली. याप्रकरणी १४ जणांच्या विरोधात तीन खूनी हल्ला आणि दरोड्याचा एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दत्तनगर, चिंचवड येथे घडली. जय कांबळे, अजय थोरात, राहुल कांबळे, मुकुंद कांबळे, दादा शिंदे, काक्‍या शिंदे, पप्या ऊर्फ सजनी सावंत, दत्ता देवकर, अभिजित गायकवाड, प्रदीप गोणे, दशरथ पात्रे, निहाल शेख, सोन्या कांबळे, मोसीन शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

  सुरज बाबा मिसाळ (वय १८), आरती अक्षय कोडके (वय २२), परशुराम किशोर शिंदे (वय ४९) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर रंजना निवृत्ती शिंदे , सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी रंजना शिंदे यांच्या हातगाडीवर गेले. आम्ही या भागातील दादा आहोत, आम्हाला हप्ता द्यायचा असे म्हणून दहशत निर्माण करण्यासाठी आरडा ओरडा करीत वडापावच्या गाडीवरील साहित्याची तोडफोड केली. तसेच गल्ल्यातील एक हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

  त्यानंतर आरोपी साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सुरज मिसाळ हे दत्तनगर, चिंचवड या ठिकाणी बसले होते. त्यावेळी आरडा ओरडा करीत आरोपी तिथे आले. आपल्या विरोधात पोलीस तक्रार करणाऱ्या गण्या शिंदेला हा मदत करतो काय, असे म्हणत आरोपींनी आपल्या हातातील कोयत्याने सुरज याच्या डोक्‍यावर वार करीत ज्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तो चुकविता. त्यानंतर सुरज यांच्या दिशेने दगड फेकून मारले.

  त्यानंतर रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास आरोपी परशुराम शिंदे यांच्या दत्तनगर, चिंचवड येथील घरी गेले. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करीत फिर्यादी यांचा मुलगा गणेश शिंदे याला लाकडी दांडक्‍याने आणि दगडाने डोक्‍यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

  त्यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी आरती यांना आपल्या भावावर झालेल्या खूनी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी आरोपींनी आरती यांनाही रस्त्यात अडवून कोयता, लाकडी दांडक्‍याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पळून गेल्या. त्यावेळी देखील आरोपींनी त्यांच्यावर दगड भिरकावल्याचे फिर्यादी म्हटले आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.