दहा दिवसात पाऊण लाख गणेशमुर्तींचे संकलन, १२१ टन निर्माल्य जमा

कोरोना महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी विसर्जनासाठी बंदी असल्याने गर्दी टाळण्याकरिता महापालिकेतर्फे यावर्षी गणेशोत्सवादरम्यान आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या संकलन केंद्रांमध्ये एकूण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये एकूण ७४ हजार ६८३ गणेश मूर्तींचे संकलन व विसर्जन करण्यात आले. तसेच १२१ टन निर्माल्य संकलन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

    पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक न काढता साधेपणाने कृत्रिम हौदात अथवा घरच्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. नागरिकांनी गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देऊ नये, कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी शहरातील विसर्जन घाट बंद ठेवण्यात आले होते. शहरातील विसर्जन घाटासह महत्वाच्या चौकात पोलीसांचा खडा पहारा होता. कोरोना महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी विसर्जनासाठी बंदी असल्याने गर्दी टाळण्याकरिता महापालिकेतर्फे यावर्षी गणेशोत्सवादरम्यान आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

    अनंत चतुर्दशी दिवशी अ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे २ हजार ९८१, ब क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ९ हजार १८३, क क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ३ हजार ४२३, ड क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ३ हजार ४४६, इ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ७ हजार ७२४, फ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे १७ हजार १४५, ग क्षेत्रीय कार्यालयाद्वारे १० हजार ३१५, ह क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ५ हजार ३४९ अशा एकूण ५९ हजार ५६६ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे महापालिकेच्या वतीने विविध खाणींमध्ये विधीवत विसर्जन करण्यात आले.

    सातव्या दिवशी १५ हजार गणेश मूर्तींचे संकलन

    गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ९२२, ब क्षेत्रीय हद्दीत ४ हजार ४२२, क क्षेत्रीय १ हजार ७७०, ड क्षेत्रीय १ हजार ५६०, इ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ९६३, फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ८३७, ग क्षेत्रीय कार्यालयामध्ये २ हजार ७२, ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २ हजार ५७१ अशा १५ हजार ११७ गणेश मूर्तींचे संकलन आणि विसर्जन करण्यात आले.