१५ सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरू होणार, शुल्क कपातीबाबत सर्वांनी नागपूर विद्यापीठाचा आदर्श घ्यावा : उदय सामंत

कोरोना संकटकाळात नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात कपात करून विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर विद्यापीठांनीदेखील शुल्ककपातीचा निर्णय घ्यावा, यासाठी सोमवारी (आज) कुलगुरूंसोबत बैठक घेऊन शुल्ककपातीचे आवाहन करण्यात येणार आहे.

    पुणे : येत्या १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सामंत काल बोलत होते. कोरोना संकटकाळात नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात कपात करून विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर विद्यापीठांनीदेखील शुल्ककपातीचा निर्णय घ्यावा, यासाठी सोमवारी (आज) कुलगुरूंसोबत बैठक घेऊन शुल्ककपातीचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मंत्रालय स्तरावरून विद्यापीठांना पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी ग्वाहीही सामंत यांनी दिली.

    प्राध्यापक भरती कोरोनामुळे थांबली होती. ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिला टप्पा म्हणून ३ हजार ७४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पुढील आठवडय़ापासून सुरू करण्यात येईल. तसेच १२१ जागांवर ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील ६५९ जागांवर शिक्षकीय भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सामंत म्हणाले.

    colleges will be reopens from 15 September 2021 in maharashtra know the details