
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून शहरात अचानक गुन्हेगारांची झाडाझडती
पुणे : पुणे पोलीसांकडून “ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम” राबवत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. या मोहिमेत तब्बल सव्वा तीन हजार गुन्हेगार चेक करण्यात आले आहेत. त्यात ८०० गुन्हेगार मिळून आले असून, गुन्हे शाखा व स्थानिक पोलीसांकडून ही मोहिम राबविली आहे.
शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून शहरात अचानक गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जात आहे. त्यासाठी विशेष मोहिम राबवत मध्यरात्री एकत्रित कोम्बिंग ऑपरेशन राबिवले जाते. त्यात गुन्हेगारांचे चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई तसेच हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी चेक केले जातात. यावेळी संशयीत व्यक्तींकडे चौकशी केली जाते. त्यानुसार, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे तसेच गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने केली.
या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान स्थानिक पोलीसांनी १० हजारांचे ३३ कोयते, साडे तीन हजारांच्या ८ तलवारी, एक चॉपर जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखा एकने करण उर्फ ठोम्ब भानुदास आगलावे (वय १८), नामदेव महेंद्र कांबळे (वय २१) याला अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला पकडले. त्यांच्याकडून तांब्याचे पाईप जप्त केले. तर युनिट तीनने पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ जंगल्या राजु भालेवर (वय २५) याला पकडले आहे. तसेच, युनिट पाचने पंकज विठ्ठल कांबळे (वय १९) याला अटक केली. तर युनिट सहाने पाहिजे आरोपी कनवरसिंह कालुसिंग टाक (वय २१) याला अटक केली आहे.
तसेच, अमली पदार्थ विरोधी पथकाने ९५ हजारांचा गांजा व एमडीएमएच्या पिल्स जप्त केल्या आहेत. तर पथक दोनने येरवड्यात ८० हजारांचा गांजा पकडला आहे. तसेच, मुंबई प्रोव्हिबिशन अॅक्टनुसार १८ गुन्हे दाखल करत ८ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजारांचा एवज जप्त केला आहे. सीआरपीसी कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत १०२ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच रात्रीत १८१ हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली आहे. पुणे पोलीसांकडून अचानक राबविण्यात येत असलेल्या ऑल आऊट मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये तसेच अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे गुन्हेगारीला लगाम लागण्यास देखील फायदा होत आहे.