गणेश विसर्जनाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवा; अजित पवारांचे बैठकीत निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडद येथील आयुर्वेदिक कॉलेजच्या जागा, परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण कामाची पाहणी केली.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणेश विर्सजनाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवून गणेश मूर्तीच्या विसर्जनाचे (Ganesha Immersion) योग्य नियोजन करावे आणि कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

  बारामती परिसरातील सार्वजनिक कामांच्या पाहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.

  बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, कोरोना चाचण्या, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यू रेट, बाधित ग्रामपंचायतींची संख्या लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

  विकासकामे वेळेत पूर्ण करा

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडद येथील आयुर्वेदिक कॉलेजच्या जागा, परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण कामाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विकास कामांची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

  सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच कामाचा दर्जा उत्तम राहील याकडे विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. सर्वच विभागांनी विकास कामे समन्वयाने पार पाडावीत, निधीचा पुरेपूर वापर करावा. सर्वानीच जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

  बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यांचे भूमिपूजन

  मोरगाव रोड गट न. २२० ते जामदार रोड, गट नं. १३७ ते निरा रोड, गट नं ३४८ ते फलटण रोड गट नं. ५३ पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे सदस्य सुरेश सातव, गट नेता सचिन सातव, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.