कोरोनामुळे २९४ बालके झाली अनाथ ; जिल्हा समिती करणार संगोपन

कोरोनाच्या विळख्यात अनेक कुटुंबे सापडली आहेत. दुसऱ्या लाटेत अनेक घरातील कत्र्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांच्या पाल्यांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ती बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता आहे. बाल कामगार, बाल भिक्षेकरी किंवा मानवी तस्करीत सापडण्याची धोका आहे.

  पिंपरी : कोरोना महामारीने आईवडील दगावल्याने शहरातील २९४ बालके पोरकी झाली आहेत. आई दगावलेले ४१, वडील दगावलेले सर्वाधिक २४५ बालके आणि आई व वडील दोघेही दगावलेले ८ अनाथ बालके शहरात आहेत. त्या अनाथांना सांभाळण्यासाठी सक्षम नातेवाईक नसल्यास त्यांचे संगोपन जिल्हा समिती करणार आहे.

  – टास्क फोर्सची त्रिसदस्यीय समिती स्थापन
  कोरोनाच्या विळख्यात अनेक कुटुंबे सापडली आहेत. दुसऱ्या लाटेत अनेक घरातील कत्र्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांच्या पाल्यांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ती बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता आहे. बाल कामगार, बाल भिक्षेकरी किंवा मानवी तस्करीत सापडण्याची धोका आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स गठित करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशावरून पुणे जिल्हा टास्क फोर्स निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने १८ मे रोजी टास्क फोर्सची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

  -काळजी व संरक्षणाची गरज
  या टास्क फोर्स समितीच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या ० ते १८ वयोगटांतील पाल्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. अनाथ बालकांच्या मदतीसाठी महापालिकेने ८८८८००६६६६ हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात शहरातील विविध भागातील एकूण २५६ अनाथ बालकांची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्वेक्षणात मृत्यू झालेल्या पालकांची माहिती घेण्याबरोबरच त्या बालकांचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, असा बालकांची माहिती जिल्हा बाल कल्याण समितीकडे पाठविली जात आहे. समितीचे एक पथक त्या बालकांना भेटून माहिती घेणार आहे. नातेवाईक सांभाळण्यास असमर्थ असतील तर, त्याला शासनाच्या संगोपन केंद्रात दाखल केले जाणार आहे. त्या बालकांना परस्पर दत्तक घेता येणार नाही, असे अधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले आहे.

  कोरोनामुळे आई किंवा वडिलाचा मृत्यू झाल्याने अनाथ बालकांबाबत कोणाला माहिती असल्यास ती महापालिकेस कळवावी. ८८८८००६६६६ या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. त्यामुळे अनाथ बालके सुरक्षित राहून त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन होईल.

  -उल्हास जगताप,अतिरिक्त आयुक्त,महापालिका