प्रदूषित भागात कोरोना रुग्ण अधिक : विविध संस्थांचे संशोधन ; राज्यात पुणे, मुंबई संवेदनशील शहरे

महाराष्ट्रातील प्रदूषणाच्या संवेदनशील ठिकाणच्या दैनंदिन वायू प्रदूषणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे फुफ्फुस कमजोर होऊ शकते. जेव्हा मानवनिर्मित उत्सर्जन आणि कोरोना विषाणू यांची बेरीज होते तेव्हा फुफ्फुसांचे नुकसान तीव्र गतीने होते.

  पुणे : अतिसूक्ष्म धूलिकणाचे (पीएम २.५) प्रमाण जास्त असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाचा रुग्णांची संख्यादेखील अधिक असल्याचे आढळून आले आहे. यावरूनच वाढते वायू प्रदूषण आणि कोरोना रुग्णांची संख्या यांच्यात थेट संबंध असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

  भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), उत्कल विद्यापीठ व आयआयटी भुवनेश्वर आणि राऊरकेलातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने (एनआयटी) ‘वायू प्रदूषणाचा कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू याचा थेट संबंध आहे का?’, या विषयावर अभ्यास करण्यात आला. यामध्ये आयआयटीएमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग, डॉ. सरोज कुमार साहू, पूनम मंगराज, सुवर्णा टिकले, भीष्म त्यागी आणि व्ही. विनोज यांचा समावेश आहे.

  हे संशोधन नुकतेच ‘अर्बन क्लायमेट’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले. त्यानुसार वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रात जास्त प्रदूषण निर्माण करणारे पुणे आणि मुंबई हे शहर देशातील संवेदनशील ठिकाणांपैकी आहेत.डॉ. साहू म्हणाले, पीएम २.५ हे श्वासन संस्थेला बाधित करणारे सूक्ष्म कण असून, कोरोनाचाही आरोग्यावर तसाच परिणाम होतो. तसेच ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्र १७.१९ लाख कोरोना रुग्णांची संख्या नोंदली गेली. पीएम२.५ च्या दरडोई उत्सर्जनात महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या पुढे आहे. तर देशपातळीवर पीएम २.५ उत्सर्जनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  डॉ. बेग म्हणाले, महाराष्ट्रातील प्रदूषणाच्या संवेदनशील ठिकाणच्या दैनंदिन वायू प्रदूषणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे फुफ्फुस कमजोर होऊ शकते. जेव्हा मानवनिर्मित उत्सर्जन आणि कोरोना विषाणू यांची बेरीज होते तेव्हा फुफ्फुसांचे नुकसान तीव्र गतीने होते.

  असा झाला अभ्यास
  -मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात कोरोना रुग्णांचे निरीक्षण.
  -देशातील १६ शहरांपैकी मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश.

  -अतिसूक्ष्म धूलिकणाचे (पीएम २.५) उत्सर्जन
  हाय रिझोल्युशन ग्रीड’ पद्धतीने मोजले. उत्सर्जनाचे कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या आकडेवारीबरोबर विश्लेषण केले.

  -संशोधनाचे फायदे

  कोरोनाचा सामना व उपाययोजनांच्या पूर्वतयारीचे धोरण  ठरविण्यासाठी महत्त्वाचे.अधिक प्रदूषणाच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात मदत. सूक्ष्म कणांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकासावर भर मुंबई आणि पुण्यासारख्या प्रदूषित शहरांत राहणाऱ्या नागरिकांना कोरोना होण्याचा धोका जास्त असल्याचे या संशोधनातून सिद्ध होत आहे. यामुळे या शहरांत स्वच्छ हवा कृतिकार्यक्रम धोरणांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.