अपहरणप्रकरणी नगरसेवक घोगरे यांना दिलासा नाहीच

तक्रारदार निखील दिवसे यांना सराईत गुंड सदा ढावरे याच्यामार्फत विद्यमान नगरसेविकेंच्या पतीच्या सांगण्यावरून धनराज घोगरे यांची तक्रार मागे घेण्याकरिता जबरदस्तीने अपहरण करून न्यायालयात नेले होते. तसेच, वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेली केस माघारी न घेतल्यास त्यांचे व त्याच्या कुटुंबियांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती.

    पुणे : गुन्ह्यातील तक्रारदाराचे अपहरण केल्याप्रकरणात भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह इतरांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने संबंधित गुन्ह्याच्या तपाशी अंमलदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.
    पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात ठेकेदाराला काम मिळवून देतो, असे सांगून तीन लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे प्रभाग क्रमांक २५ चे नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ठेकेदाराने तक्रार दिली होती.

    त्यानंतर तक्रारदार निखील दिवसे यांना सराईत गुंड सदा ढावरे याच्यामार्फत विद्यमान नगरसेविकेंच्या पतीच्या सांगण्यावरून धनराज घोगरे यांची तक्रार मागे घेण्याकरिता जबरदस्तीने अपहरण करून न्यायालयात नेले होते. तसेच, वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेली केस माघारी न घेतल्यास त्यांचे व त्याच्या कुटुंबियांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती. तसेच केस माघारी न घेतल्यास त्याच्यावर खंडणीची केस करु अशी धमकी दिली होती. बळजबरीने न्यायालयात आणल्यानंतर तक्रारदार तेथून लघुशंकेच्या बहाण्याने पसार झाले होते. त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यानुसार, अपहरणासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

    जिल्हा व सत्र न्यायालयात यातील संशयित आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या सुनावणी दरम्यान, तक्रारदार यांच्याकडून ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींनी वानवडीचा गुन्हा मागे घेण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची मदत घेऊन धमकावले असून, आजही धमकावत आहेत, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर दिलासा न देता या गुन्ह्यातील तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे मागवले आहे.