अण्णासाहेब मगर यांच्या नावाने निवासी मिळकतधारकांना ‘अपघाती विमा योजना’ लागू करा नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

रुग्णवाहिकेसाठी तीन हजार रुपये द्यावेत. अपघाताने पूर्णत: कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये द्यावेत. निवासी मिळकत धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या शिक्षण घेणा-या २३ वर्षे वयापर्यंतच्या दोन मुलांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात यावेत. नियमितपणे मिळकत कर भरणा-यांना ही सुविधा लागू करावी.

    पिंपरी: पुणे महापालिकेत निवासी मिळकतकर धारक, त्यांच्या कुटुंबियांसाठी अपघात विमा योजना लागू आहे. त्याचधर्तीवर पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या नावाने शहरातील निवासी मिळकतधारकांसाठी अपघाती विमा योजना सुरु करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

    याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, पुणे महापालिकेने निवासी मिळकतधारकांकरिता अपघाती विमा योजना लागू केली आहे. अपघात झाल्यास मिळकतधारकाला महापालिकेकडून आर्थिक सहाय्य केले जाते. त्याचधर्तीवर पिंपरी महापालिकेनेही अपघात विमा योजना लागू करावी. या योजनेत निवासी मिळकत धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत द्यावी. निवासी मिलकत धारक पती, पत्नीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत करावी. निवासी मिळकतधारकाच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये द्यावेत. निवासी मिळकत धारकावर अवलंबून असलेल्या २३ वर्षाखालील पहिल्या दोन अपत्यांपैकी कोणाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख ५० हजार रुपयांची मदत करावी.

    मिळकत धारकांचे दिव्यांग मूल (५० टक्यांपेक्षा जास्त), पालकांवर अवलंबून असलेली अविवाहित मुलगी, घटस्फोटीत मुलगी (पुनर्विवाहित नसलेली आणि पालकांवर अवलंबून असलेली) यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये द्यावेत. कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला एका वर्षामध्ये जास्तीत-जास्त एक लाख दवाखान्यात असतानाचा, औषधांचा व दवाखान्याचा खर्च देण्यात यावा. पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण एका कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला वर्षातून एकदा वापरता येईल असे करावे.

    रुग्णवाहिकेसाठी तीन हजार रुपये द्यावेत. अपघाताने पूर्णत: कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये द्यावेत. निवासी मिळकत धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या शिक्षण घेणा-या २३ वर्षे वयापर्यंतच्या दोन मुलांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात यावेत. नियमितपणे मिळकत कर भरणा-यांना ही सुविधा लागू करावी. मिळकतधारक महापालिकेचा विचार करतात. त्यामुळे महापालिकेनेही मिळकतधारकांचा विचार करावा आणि ही योजना लागू करावी. या योजनेला शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांचे नाव द्यावे, अशी विनंती नगरसेवक वाघेरे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.