खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आढळले मगरीचे पिल्लू

हे चार महिन्यांचे पिल्लू बॅकवॉटरच्या बाहेर आलेले होते. त्यामुळे परत तिथेच सोडले असते तर ते वाचले नसते. म्हणून त्याला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोडले.

     पुणे: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मगरीचे पिल्लू आढळून आल्याची घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर आढळून आली हाेती. त्यानंतर आता हे एक चार महिन्यांचे पिल्लू दिसले आहे. खानापूर परिसरातील बॅकवॉटरमध्ये मगरीचे प्रजनन होत असल्याने त्या ठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. परंतु, त्यांनी कधीही कोणावर हल्ला केलेला नाही.
    हे चार महिन्यांचे पिल्लू बॅकवॉटरच्या बाहेर आलेले होते. त्यामुळे परत तिथेच सोडले असते तर ते वाचले नसते. म्हणून त्याला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोडले. काही महिने तिथे मोठे झाल्यावर त्याला पुन्हा निसर्गात सोडता येते. याविषयी ‘पीआरटी’ पथकाचे तानाजी भोसले, अक्षय जाधव, धवल तुडमवार व सूरज कवडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर व्यास संस्थेचे मनोज वाल्हेकर यांनीदेखील त्यांना मदत केली.

    'मगरी एका वेळी पन्नासहून अधिक अंडी देतात, पण त्यातील सर्वच पिल्लं जगत नाहीत. त्यातील काही अंडी इतर वन्यजीव खातात किंवा काही फुटतात. जर ही पिल्लं मगरीजवळच राहिली तर ती जगतात. ती तर आईपासून दूर गेली, तर त्यांना मोठे मासे खाऊन टाकतात किंवा इतर जीव मारून टाकतात. ''

    तानाजी भोसले ,वन्यजीव संरक्षक