सीसीसी सेंटर बंद केल्यावर करोडोचे साहित्य वाऱ्यावर

घरकुल येथील इमारतीमध्येही सेंटर सुरु केले होते. महापालिकेने वैद्यकीय उपकरणे, रुग्णाला लागणारे साहित्य खरेदी केले. सर्व साहित्यासह एका खासगी संस्थेला हे सेंटर संचलनासाठी दिले होते. त्यापोटी संस्थेच्या कोट्यावधी रुपये बीलांचीही पूर्तता करण्यात आली. दुसऱ्या लाटेतही हे 'सीसीसी' सेंटर सुरू होते.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड महापालिकेने कोरोनाबाधीत झालेल्या लक्षणेविरहित रुग्णांसाठी घरकुलमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करुन कोरोना काळजी केंद्र (सीसीसी) सुरु केले. रुग्णसंख्या आटोक्यात येताच हे सीसीसी सेंटर बंद करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणचे कोट्यवधी किमतीचे साहित्य अक्षरश: वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. महापालिकेने तिथे सुरक्षारक्षकही नेमला नाही. परिणामी, या साहित्याची तोडफोड, चोरी, नासधूस सुरू झाली आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेचा दावा किती पोकळ आहे, हे यावरून स्पष्ट होते.

    करदात्यांच्या पैशांतून खरेदी केलेल्या साहित्याचे नुकसान होत असतानाही महापालिका प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. यामुळे नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी – चिंचवड शहरात १० मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिकेने कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेले नागरिक, स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले नागरिक आणि अलगीकरणासाठी शहराच्या विविध भागातील ११ ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारले होते.

    घरकुल येथील इमारतीमध्येही सेंटर सुरु केले होते. महापालिकेने वैद्यकीय उपकरणे, रुग्णाला लागणारे साहित्य खरेदी केले. सर्व साहित्यासह एका खासगी संस्थेला हे सेंटर संचलनासाठी दिले होते. त्यापोटी संस्थेच्या कोट्यावधी रुपये बीलांचीही पूर्तता करण्यात आली. दुसऱ्या लाटेतही हे ‘सीसीसी’ सेंटर सुरू होते.

    जून २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली. त्यामुळे महापालिकेने ‘सीसीसी’ सेंटर बंद केले. त्यामुळे संस्था सोडून गेली. पण, कोट्यावधी रुपयांचे साहित्य तिथेच जैसे थे अवस्थेत ठेवण्यात आले आहे. गरम पाण्यासाठी इलेक्ट्रीक गिझर, अग्नि प्रतिबंधक उपकरणे, ऑक्सीजन सिलींडर, टेबल, बेड, गाद्या, चादर, खुच्र्या, दिव्यांगाचे साहित्य, ताट, ग्लास, सॅनिटायझर, रुमाल, थर्मास असे कोट्यावधी रुपयांच्या साहित्याची खरेदी केली. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या घटताच महापालिकेचे या सेंटरकडे दुर्लक्ष झाले. कोट्यावधी रुपयांचे साहित्य असतानाही सुरक्षा रक्षक नेमला नाही. कोणत्याही खोलीला साधे कुलूप लावण्याची तसदी देखील महापालिका प्रशासनाने घेतली नाही.

    हॅण्डग्लोज, हातमोजे, गाद्या, पाण्याच्या बाटल्या तिथेच जाळल्या आहेत. इमारतीमधील इलेक्ट्रीकल फिटींग, प्लंबिंगचे साहित्य तोडले आहे. याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे सेंटर तळीरामांसह जुगाऱ्यांचा अड्डा बनला आहे. ठेकेदार संस्था कोट्यावधी रुपये कमवून गेली. महापालिकेने गरज संपली की दुर्लक्ष केले. पण, करदात्यांच्या पैशांतून खरेदी केलेल्या साहित्याच्या होत असलेल्या नुकसानीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ओमायक्रॉनच्या संकटासह तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेत ‘सीसीसी’ सेंटरची गरज लागल्यास महापालिका पुन्हा या सेंटरवर कोट्यावधी रुपये खर्च करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.