यंदा शहरातील जन्म दरात घट ; नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल ३७ टक्‍क्‍यांची घट

शहरात अजूनही मुलींचा जन्म दर मुलांच्या तुलनेत कमीच , शहरात केवळ १५ हजार ९४८ मुला-मुलींच्या जन्माची नोंद

    पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात यंदा मुले जन्माला येण्याच्या संख्येत खूप मोठी घट दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल ३७ टक्‍क्‍यांची घट दिसून येत आहे. तसेच एकीकडे देशात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक झाला असला तरी शहरात अजूनही मुलींचा जन्म दर मुलांच्या तुलनेत कमीच आहे.

    सन २०१६ पासून ते सन २०२० पर्यंतचे जन्माचे आकडे पाहिल्यास शहरात दरवर्षी सरासरी २७ हजार ५०० हून अधिक मुले-मुली जन्म घेतात. यानुसार दर महिन्याला सुमारे २२०० ते २३०० बाळांचा जन्म होतो. परंतु २०२१ च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरात केवळ १५ हजार ९४८ मुला-मुलींच्या जन्माची नोंद झाली आहे.

    सरासरीच्या तुलनेत हा आकडा सुमारे ३७ टक्‍क्‍यांनी कमी आहे. कोविड काळात अनेक जणांनी आपल्या मूळगावी स्थलांतर केले. तसेच मार्च २०२० नंतरचा कडक लॉकडाऊनचा काळ व त्यांनंतरचे निर्बंध यामुळे गेल्यावर्षी विवाहही खूप कमी झाले. यामुळे जन्माचे प्रमाण घटल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

    एकीकडे देशात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्म दरात वाढ झालेली दिसत आहे. परंतु शहरात अजूनही मुलींच्या जन्म दरात अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. सन २०१६ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९३० होते. परंतु २०१७ मध्ये या प्रमाणात घट होऊन ते ९१७ एवढे कमी झाले तर तर २०१८ मध्ये त्यात मोठी घट होऊन ८८५ एवढे झाले होते.परंतु २०१९ मध्ये पुन्हा त्यात सुधारणा होऊन ते ९०७ एवढे वाढले. तर २०२० मध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन ९३० पर्यंत गेले. तर नोव्हेंबर २०२१ अखेरपर्यंत ११९ एवढे प्रमाण आहे.