पिंपरी चिंचवड आरटीओच्या उत्पन्नात घट; नागरिकांची वाहन खरेदीकडे पाठ

पिंपरी- चिंचवड आरटीओ कार्यालयांतर्गत खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांचाही समावेश होता.त्यामुळे महसूल मोठ्या प्रमाणावर जमा होतो.परंतु, लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.रोजगार बुडाले. काहींनी शहर सोडून गाव गाठले.त्यामुळे नागरिकांनी वाहन खरेदी टाळली.बऱ्याच जणांचे वर्क फ्रॉम होम आजतागायत सुरु आहे.पेट्रोल महागल्याने बऱ्याच जणांनी दुचाकीच्या वापर कमी केला.पैसे वाचविण्याच्या गरजेपोटी शेअरिंग प्रवास सुरु केला

  पिंपरी: पिंपरी चिंचवड़ उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचा उत्पन्नावर लॉकडाउनचा चांगलाच परिणाम झाला आहे.एप्रिल आणि मे २०२० या कालावधीत अवघ्या १ हजार २१७ वाहनांची नोंद झाली असून, आरटीओला ६ कोटी ५६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. २०२१ एप्रिल आणि मे महिन्यात ८ हजार ५४३ वाहनांची नोंद झाली, त्यातून ४८ कोटी ९७ लाख रुपये महसूल आरटीओला मिळाला.परंतु, दरवर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणी घटली असून नागरिकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसले, परिणामी २०१९ च्या तुलनते २०२० – २१ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे मोठा फटका आरटीओला बसला आहे.

  दसरा, दिवाळीसह विविध सण – उत्सवांच्या मुहूर्तावर आरटीओची बक्कळ कमाई होते. दरवर्षी लाखांच्या घरात नव्या वाहनांची नोंद होऊन शंभर कोटींच्यावर महसुलाचा टप्पा आरटीओ ओलांडते. एप्रिल २०२० या महिन्यांत आरटीओ कार्यालय पूर्णपणे बंद ठेवले होते. यावर्षी मात्र, पूर्ण चित्र पालटल्याचे दिसले.दरवर्षी आरटीओला विविध कर स्वरुपात तसेच, दंडात्मक कारवाईतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. सर्वाधिक उत्पन्न हे वाहन परवाना आणि तडजोडी शुल्कापोटी मिळते.यावर्षी लॉकडाऊनमुळे जवळपास ५० टक्क्यांच्यावर दंडाची रक्कम घटली आहे.वाहनेच रस्त्यावर नसल्याने दंडाची अंमलबजावणी करताना आरटीओला मोठी अडचण आली.परिणामी, महसूल तोटा मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला.वाहनांचा फिटनेस, अवजड वाहने, हेल्मेट याची वायूवेग पथकाद्वारे तपासणी होते. रस्त्यावर वाहन चालक कमी असल्याने दंड वसुलीवर परिणाम झाल्याचे आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

  पिंपरी- चिंचवड आरटीओ कार्यालयांतर्गत खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांचाही समावेश होता.त्यामुळे महसूल मोठ्या प्रमाणावर जमा होतो.परंतु, लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.रोजगार बुडाले. काहींनी शहर सोडून गाव गाठले.त्यामुळे नागरिकांनी वाहन खरेदी टाळली.बऱ्याच जणांचे वर्क फ्रॉम होम आजतागायत सुरु आहे.पेट्रोल महागल्याने बऱ्याच जणांनी दुचाकीच्या वापर कमी केला.पैसे वाचविण्याच्या गरजेपोटी शेअरिंग प्रवास सुरु केला.काहींनी तर जवळच्या कामकाजासाठी सायकलचा वापर करणेच पसंत केले.याचा थेट परिणाम वाहन खरेदीवर झाला.

  वाहन नोंदणी
  एप्रिल २०२० : २५६
  मे २०२० : ९६१
  एप्रिल २०२१ : ४६९४
  मे २०२१ : ३८४९

  प्राप्त महसुल (नोंदणी, टॅक्स, दंडात्मक कारवाई)
  एप्रिल २०२० : ९४ लाख १६ हजार

  मे २०२० : ५ कोटी २३ लाख

  एप्रिल २०२१ : २३ कोटी ९४ लाख

  मे २०२१ : २५ कोटी ३ लाख

  दंडात्मक वसुली
  एप्रिल २०२० : शुन्य

  मे २०२० : २१ लाख

  एप्रिल २०२१ : ३१ लाख ५३ हजार

  मे २०२१ : ४६ लाख ९३ हजार