व्याजाच्या पैशांच्या बदल्यात ५ एकर जमीनीची मागणी ; अपहरण करत डांबून ठेवलेल्याची सुटका

मनोज भरगुडे पुणे पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल आहे. दरम्यान, तक्रारदारांनी अनिल हगवणेकडून व्यवसायास करण्यासाठी मार्च २०१८ मध्ये दरमहा १० टक्के व्याजाने एकूण १५ लाख रुपये घेतले होते. त्यावेळी हगवणे याने ५०० रुपयांचा कोरा सही केलेला स्टॅम्प आणि ५ बँकेचे कोरे चेक घेतले होते. तक्रारदारांनी १० लाख ५० हजार रुपये व्याज दिले आहे.

    पुणे : दहा टक्के व्याजाने पैसे घेतल्याच्या मोबदल्यात ५० लाख किंवा ५ एकर जमीन नावावर करुन देण्यासाठी एकाचे अपहरणकरत पुण्यात डांबून ठेवलेल्या तरुणाची पुणे पोलीसांनी सुखरूप सुटका केली. त्याला सात जणांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यात शहर पोलीस दलातील पोलीसाचा समावेश आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    अनिल लक्ष्मण हगवणे (वय ३३ रा. संभाजीनगर, धनकवडी), किरण सोपान भिल्लारे (वय ३५ रा. भिल्लारवाडी, कात्रज), विशाल अनिल जगताप (वय २२ रा. भिल्लारवाडी, कात्रज), संदीप चंद्रकांत पोखरकर (वय २४ रा. संभाजीनगर, धनकवडी), अभिजीत दत्तात्रय देशमुख (वय ३० रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), मनोज ज्ञानेश्वर भरगुडे (वय ३२ रा. आंबेगाव फाटा, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, रंजीत उर्फ बाजू पायगुडे हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी नितीन कैलास पवार (वय ३३ रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    मनोज भरगुडे पुणे पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल आहे. दरम्यान, तक्रारदारांनी अनिल हगवणेकडून व्यवसायास करण्यासाठी मार्च २०१८ मध्ये दरमहा १० टक्के व्याजाने एकूण १५ लाख रुपये घेतले होते. त्यावेळी हगवणे याने ५०० रुपयांचा कोरा सही केलेला स्टॅम्प आणि ५ बँकेचे कोरे चेक घेतले होते. तक्रारदारांनी १० लाख ५० हजार रुपये व्याज दिले आहे. तर, किरण भिलारेकडून देखील त्यांनी ९ लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात व्याज म्हणून आतापर्यंत ६० हजार रुपये दिले होते. हगवणे आणि भिलारे यांनी मुद्दल आणि व्याजाच्या रकमेपोटी ५० लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास ५ एकर शेत जमीन लिहून देण्याची मागणी करत होते. जमिन लिहून दिली नाहीतर पत्नी आणि मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, शुक्रवारी (दि.17) आरोपींनी किरण भिलारे याची गाडी आणायची असल्याचे सांगून फिर्यादी यांना घरातून जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. त्यांना धनकवडी येथील शंकर महाराज मठ येथे आणले होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मनोज भरगुडेने प्रकरण मिटवून टाक असे सांगत शिवीगाळ करुन मारहाण केली. तर, त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले होते.

    दरम्यान, ही माहिती खडंणी विरोधी पथक एकमधील पोलीस कर्मचारी रमेश चौधर व अमर पवार यांना मिळाली. त्यानुसार, लागलीच सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा व त्यांच्या पथकाने येथे सापळा रचून तक्रारदारांची सुखरूप सुटका केली. तसेच, सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. पोलीसांनी सर्व प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर हा प्रकार शिरूर येथे घडल्याचे समोर आले. पोलीसांनी सहकारगनर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करत हा गुन्हा पुढील तपासासाठी शिरूर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

    दरम्यान, मनोज भरगुडे हा शहर पोलीस दलातील कर्मचारी आहे. त्याची नेमणूक पोलीस मुख्यालयात होती. दरम्यान, तो मुख्यालयात नेमणूकीस असला तरी त्याला नेमकी ड्युटी कोठे होती. तो ड्युटीला होता का, अशी चर्चा आज पोलीस दलात सुरू आहे. डीओ अन वरिष्ठांना मॅनेजकरून तो फक्त दप्तरी ड्युटीला असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचारी ड्युटी करतात कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांर्भियाने पहावे लागणार आहे.