Demand for Mocca action against NCP corporator Dabbu Aswani and his associates

सुरेश निकाळजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अनेक चांगली पावले उचलली आहेत. त्यानुसार अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील आसवाणी टोळीवर तडीपार आणि मोक्काची कारवाई करावी. ही टोळी आर्थिक फायद्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात अनेक वर्षापासून संगठीतपणे गुन्हे करत आहे. या टोळीने पिंपरी चिंचवड शहरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खुन, खुनाचे प्रयत्न, दरोडा, क्रिकेट बुकिंग, अवैध दारू विक्री, जमिनीवर जबरदस्ती ताबा करणे, मारहाण, दंगल असे अनेक गुन्हे केले आहेत.

    पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसेचे विद्यमान नगरसेवक तसेच माजी उपमहापौर व स्थायी समितीचे माजी सभापती हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केली आहे. याबाबत निकाळजे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

    सुरेश निकाळजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अनेक चांगली पावले उचलली आहेत. त्यानुसार अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील आसवाणी टोळीवर तडीपार आणि मोक्काची कारवाई करावी. ही टोळी आर्थिक फायद्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात अनेक वर्षापासून संगठीतपणे गुन्हे करत आहे. या टोळीने पिंपरी चिंचवड शहरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खुन, खुनाचे प्रयत्न, दरोडा, क्रिकेट बुकिंग, अवैध दारू विक्री, जमिनीवर जबरदस्ती ताबा करणे, मारहाण, दंगल असे अनेक गुन्हे केले आहेत.

    निकाळजे यांच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, या टोळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसेचे विद्यमान नगरसेवक तसेच माजी उपमहापौर व स्थायी समितीचे माजी सभापती हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी यांच्यासह धनराज आसवाणी, श्रीचंद आसवाणी, अनिल आसवाणी, राजू आसवाणी, भारत आसवाणी, हरीष आसवाणी, गुलाबचंद आसवाणी, जय आसवाणी, आशिष आसवाणी, लखू भोजवानी, विनोद भोजवानी यांचा समावेश आहे. या सर्वांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    आसवाणी टोळीने पिंपरी चिंचवड शहरात दहशत पसरवून खुन मारामाऱ्या, जमीन बळकावणे, क्रिकेट बुकिंग, अवैध दारू विक्री करून गडगंज संपत्ती ही कमावली आहे. त्यामुळे आसवाणी यांच्या टोळीवर तातडीने मोक्काची कारवाई करून कायदा हा सर्वांसाठी समान आहे, कायद्यापुढे कोणीही श्रीमंत किंवा गरीब नाही, हे दाखवून द्यावे. पिंपरी कॅम्प परिसर दहशतमुक्त व भयमुक्त करावा. अन्यथा आसवाणी टोळी विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात असेही निवेदनात म्हटले आहे.