जिल्हा बँकेत अजित पवार यांचं धक्कातंत्र; अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिंगबर दुर्गाडे यांच्या तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात यांची नावे चर्चेत असताना अजित पवार यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत प्रा. दिंगबर दुर्गाडे व चांदेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

    पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिंगबर दुर्गाडे यांच्या तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात यांची नावे चर्चेत असताना अजित पवार यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत प्रा. दिंगबर दुर्गाडे व चांदेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. दुर्गाडे यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे, तर चांदेरे प्रथमच निवडून आले आहेेत.

    तासाभराच्या बैठकीनंतर ठरली नावे

    उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थित अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत बैठक झाली. यात पवार यांनी इच्छुकांची मतं जाणून घेतली. एक तासाच्या बैठकीनंतर अखेर अध्यक्षपदासाठी दुर्गाडे व उपाध्यक्षपदासाठी चांदेरे यांचे नाव निश्चित करण्यात आले.

    संचालकपदी काेणाची बिनविरोध निवड?

    बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार, भोरमधून आमदार संग्राम थोपटे, पुरंदर हवेलीतून आमदार संजय जगताप, आंबेगाव तालुक्यातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडमधून आमदार दिलीप मोहिते पाटील, इंदापूरमधून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

    दुर्गाडे यांना दुसऱ्यांदा संधी

    दिगंबर दुर्गाडे यांनी ‘ड’ वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादा पाटील-फराटे यांना पराभूत केले आहे. तर चांदोरे यांनी मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत विजय मिळविला. अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांना पुन्हा संधी देण्यात येईल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र अध्यक्षपदी प्रा. दुर्गाडे यांची वर्णी लागली.

    पक्षीय बलाबल

    राष्ट्रवादी – १७
    काँग्रेस – ०२
    भाजप – ०२