खेड तालुक्याला भरघोस निधी दिल्याबद्दल नितीन गडकरी यांचे दिलीप मेदगेंनी मानले आभार

    राजगुरुनगर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते आणि माजी पालकमंत्री खासदार गिरीश बापट व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवारी (दि. २४) खेड तालुक्यातील विविध महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. खेड तालुक्याला झुकते माप देऊन १५९५ कोटी किंमतीची कामे दिल्याबद्दल पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तथा पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केंद्रीय गडकरी यांचे कार्यक्रमादरम्यान आभार व्यक्त केले.

    केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकल्प राबविले जात आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील इंद्रायणी नदी ते खेड महामार्ग सहापदरी करणे (१२६८ कोटी रुपये – १७.७७ किमी लांबी) या महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच खेड घाटाची पुनर्रचना करणे (१३० कोटी कोटी- ९.२३ किमी लांबी) या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

    तसेच उरण-पनवेल-भीमाशंकर-वाडा-खेड-पाबळ-शिरूर राष्ट्रीय महामार्ग करणे (३.९१ कोटी – १० किमी), वाडा ते घोडेगाव रस्ता करणे (२.७० कोटी – ९ किमी), डेहेणे-नायफड-पोखरी रस्ता करणे (१.९७ कोटी – ५.५ किमी), राष्ट्रीय महामार्ग १०३ ते खंडोबा माळ निमगाव रस्ता करणे (२४.२० कोटी – १२ किमी) व निमगाव खंडोबा येथील हवाई रोपवेचे सर्व सोयींसह सुधारणा व इतर बांधकाम करणे (३४.८१ कोटी) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्तेविकास खात्यामार्फत राजगुरुनगर बायपास मार्गाचे (१३० कोटी) काम प्रगतीपथावर आहे. तर चांडोली ते राजगुरूनगर पूल (११ कोटी) लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    आगामी काळात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यात सहकाऱ्यांच्या मदतीने विकासगंगा आणणार असल्याचे स्थापत्य अभियंता दिलीप मेदगे व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी यावेळी सांगितले.