गतवर्षी पहिल्या पाच महिन्यांत तुलनेत या वर्षी तीनपट मृत्यु प्रमाणपत्रांचे वितरण ; ९३५२ प्रमाणपत्रांचे वाटप

वर्षी याच पाच महिन्यांत ९ हजार ३५२ प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी २५० अशी आहे. यात सर्वाधिक मृत्यू प्रमाणपत्र एप्रिल महिन्यात वितरित करण्यात आली. या महिन्यात ३ हजार ३५५ प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. एप्रिल महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आली.

  पिंपरी: कोरोना महामारीने पिंपरी – चिंचवड शहराचेच चित्र पालटले. त्यात आता मृत्यू प्रमाणपत्र वितरणाच्या दुर्देवी संख्येचीही भर पडली. पाच महिन्यांत महापालिकेने सर्वाधिक मृत्यू प्रमाणपत्र वितरित केल्याची बाब पुढे आली आहे. मागील वर्षी पहिल्या पाच महिन्यांत तुलनेत या वर्षी तिपटीपेक्षाही जास्त प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. जानेवारी ते मे २१ या कालावधीत महापालिकेने ९ हजार ३५२ मृत्यु प्रमाणपत्रांचे वितरण केले.

  पिंपरी – चिंचवड शहरात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोरोनाने अक्षरश: मृत्यूचे थैमान घातले. त्यामुळे अनेक कुटुंब, लहान मुलेही निराधार झाली. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तर अंत्यसंस्कारालाही घाटांवरील ओटे कमी पडले, एवढे विदारक चित्र होते. आता महापालिकेच्या जन्म – मृत्यू विभागातील अधिकाNयांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू प्रमाणपत्र वितरणानेही पाच महिन्यांतील भयाण वास्तव पुढे आले.

  गेल्या काही वर्षात स्वाईन फ्लू या आजाराने डोके वर काढले होते. या आजाराने अनेकांचा बळी घेतला होता. याशिवाय कावीळ, डेंग्यू, दमा, फ्फुफुसाचे श्वसनाचे विविध आजार, तसेच एड्स, श्वसनरोग, हदयविकाराचा झटका, मेंदूचे आजार, कर्करोग आणि अपघातांमुळे मृत्यु होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. मात्र, ही आकडेवारी ११ ते १२ हजाराच्या पुढे कधी गेली नाही. २०२१ मध्ये पहिल्या पाच महिन्यातच ९ हजार ३५२ प्रमाणपत्र वितरीत झाल्याने कोरोनाचे संकट किती भीषण आहे, हे दिसून येत आहे.
  मागील वर्षी २०२० मध्ये जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यांत ३ हजार ७३५ मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. या वर्षी याच पाच महिन्यांत ९ हजार ३५२ प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी २५० अशी आहे. यात सर्वाधिक मृत्यू प्रमाणपत्र एप्रिल महिन्यात वितरित करण्यात आली. या महिन्यात ३ हजार ३५५ प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. एप्रिल महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आली.

  सन २०१८ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ११ हजार २२६ मृत्यु प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. सन २०१९ मध्ये एकूण ११ हजार १५० मृत्यु प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये वर्षभरात एकूण १२ हजार ७०२ मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. त्यामध्ये ८ हजार ५९ पुरूष तर ४ हजार ६४३ महिलांचा समावेश आहे. या आकडेवारीचा विचार केल्यास यंदा पहिल्या पाच महिन्यांत ८० टक्के प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यातूनच गेल्या पाच महिन्यांत पिंपरी – चिंचवडमध्ये कोरोनाने अनेकांचे घर उद्ध्वस्त केल्याचे दिसून येत आहे. अनेकांचा आधार हिरावला. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मोठी लाट होती. सप्टेंबर २०२० मध्ये १८१८ मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. मागील वर्षी मेमध्ये लाट कमी असल्याने ६९१ प्रमाणपत्र वितरित करण्यात आली होती.

  अनेक प्रमाणपत्र प्रलंबित

  तांत्रिक बिघाडामुळे २० मे पासून काही दिवस जन्म – मृत्यूची नोंदणी बंद होती. त्यामुळे या काळात अनेकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नाही. एप्रिल किंवा मे महिन्यांत मृत्यू झालेल्यांचे अनेक प्रमाणपत्र अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्राची संख्या आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.