वीजपुरवठा खंडित करुन नागरिकांना मनस्ताप देवू नका, अन्यथा जनआंदोलन उभारणार; महावितरणच्या मनमानी विरोधात आमदार लांडगे आक्रमक

वाढीव बिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मग, तक्रारी विचारात न घेताच वीज कनेक्शन हुकुमशाहीपद्धतीने तोडले जात आहे. याविरोधात प्रसंगी आम्ही पिंपरी-चिंचवडकर जनआंदोलन उभारणार आहोत, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

    पिंपरी: महावितरण प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम राबवली जात आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक हैराण झाले आहेत. प्रशासनाच्या मनमानीविरोधात आता भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

    आमदार लांडगे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारीचे संकट पुन्हा पिंपरी-चिंचवडकरांवर ओढावले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य व्यवस्था आणि प्रशासन आपआपल्या परीने या संकटाचा सामना करीत आहे. सर्वसामान्य नागरिक तणावात आहेत. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना महाविरण प्रशासनाकडून अवाजवी बीलांची आकरणी केली जात आहे. बील भरणा न केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे लघु उद्योजक, सामान्य नागरिक, गृहिणींमधून महाविरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. उन्हाळा सुरू झाला आहे, प्रत्येक घरात वीज अत्यावश्यक बाब आहे. आर्थिकदृष्ट्या संकटाचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे एक-दोन महिन्याचे बील निर्धारित वेळेत भरले नाही, म्हणून लगेच वीज कनेक्शन तोडून नागरिकांना त्रास देण्याची भूमिका प्रशासनाने घेवू नये.

    अन्यथा महावितरणविरोधात जनआंदोलन उभारणार!

    पिंपरी-चिंचवडचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणे आमचे कर्तव्य आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात सरकारला वीज पुरवठा खंडीत करु नका… अशी विनंती केली होती. मात्र, सरकार आणि संबंधित खात्याचे मंत्र्यांनी कार्यवाही केली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या मनमानी विरोधात रस्त्यावर उतरणे, आंदोलन करणे उचित नाही. पण, आपण आपली लढाई सनदशीर मार्गाने लढणार आहोत. गेल्या वर्षभरात नागरिकांना दिलेली वाढीव बीले अयोग्य आहेत. वाढीव बिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मग, तक्रारी विचारात न घेताच वीज कनेक्शन हुकुमशाहीपद्धतीने तोडले जात आहे. याविरोधात प्रसंगी आम्ही पिंपरी-चिंचवडकर जनआंदोलन उभारणार आहोत, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.