नातेवाईकांना कर्ज देण्यासाठी बँकेची उमेदवारी मागू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बँकेचा कारभार उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. विरोधकांनी देखील कामकाजाचे कौतुक केले असून बँक चांगली चालल्याने आम्ही निवडणूक लढवणार नसल्याचे इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे.

    बारामती: नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींना कर्ज देण्यासाठी जर कोणी बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागत असेल, अजिबात उमेदवारी मागू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना जुन्या व नव्या यांचा मेळ घालणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आयोजित ल मेळाव्यात पवार बोलत होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बँकेचा कारभार उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. विरोधकांनी देखील कामकाजाचे कौतुक केले असून बँक चांगली चालल्याने आम्ही निवडणूक लढवणार नसल्याचे इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. बँकेवरील विश्वास कायम राहण्यासाठी योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल. इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने कोणीही नाराज होऊ नये.बारामती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. बँकेचा कारभार मात्र स्वच्छ व पारदर्शी व्हायला हवा अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. इतर सहकारी संस्था व बँकेच्या कारभारात फरक असल्याने बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जुन्या नव्या यांचा मेळ घातला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    सहकारातील नवीन नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. कोणतीही चौकशी झाल्यास पारदर्शीपणे त्या चौकशीला माहिती सादर करता आली पाहिजे. रिझर्व बँकेने देखील चौकशी केल्यास पारदर्शी पद्धतीने कामकाज दिसले पाहिजे. नियमांचे पालन न करता केवळ नफा कमविण्याच्या उद्देशाने चुकीच्या पद्धतीने कारभार केल्यामुळे अनेक बॅंका अडचणीत आल्याची उदाहरणे समोर आहेत. बँकेत गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारच्या काही घटना घडल्याच्या निदर्शनास आल्या आहेत. संचालक मंडळ तसेच अधिकारी वर्ग यांनी गैरकारभार केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा सज्जड दम देखील पवार यांनी यावेळी दिला.