डॉ. माशेलकर ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कारा’ने सन्मानित; शेती उद्योगातील स्टार्टअपचे श्रेय डॉ. माशेलकर यांना – देेवेेंद्र फडणवीस

आयुष्यात अनेक पारितोषिक मिळाली आहेत. परंतु हा अटल पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. युगपुरूष अटलजींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचे महत्वच वेगळे आहे. अटलजींचे प्रेरणादायी नेतृत्व, त्यांचे मार्गदर्शन मला सीएसआयआरमध्ये असताना मिळाले. सीएसआयआर चे नेतृत्व करताना त्यांनी मला स्वातंत्र्य दिले-  डॉ. माशेलकर

पुणेे: देशातील तरुणाईच्या कल्पनाशक्तीचा वापर करून रोजगार निर्मिती करण्यासाठीची राज्याची स्टार्टअप पॉलिसी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली. मागील चार वर्षात देशातील सर्वाधीक स्टार्टअप, विशेषत: शेती उद्योग व विपणनातील सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात सुरू झाले. यामुळे आपल्याकडील तरुण शेतकरी शेतीमाल जागतिक पातळीवर स्पर्धा करू लागला आहे. याचे सर्व श्रेय डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महापौर मुरलीधर मोहोळ अध्यक्ष असलेल्या कोथरूड येथील संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा अटल संस्कृती गौरव पुरस्कार पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट,  स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बिडकर, गायिका पद्मजा फेणाणी, वैशाली माशेलकरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भारत देशाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे अटलजी.  देशातील शास्त्रज्ञांनी अणुसज्जता अगोदरच केली होती. परंतू अमेरिकेच्या दबावाखाली अणु चाचणी केली नव्हती.  आपल्याशिवाय जगाचे चालू शकणार नाही, हे ओळखणार्‍या अटलजींनी अणुचाचणी केली. डॉ. माशेलकरांनी विज्ञानाचा वापर मानवजातीसाठी कसा करता येउ शकतो, यासाठी त्यांनी महात्मा गांधीजीच्या शाश्‍वत विचाराची कास धरली. देशातील महत्वाच्या निर्णयाकरिता माशेलकर कमिटी स्थापन करावी लागली, याचे कारण त्यांची जबाबदारीने काम करायची वृत्ती. यामुळे अटलजींनी देखिल त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात डॉ. माशेलकर यांच्यावर विश्‍वास टाकला होता. देशातील तरुणाईकडे प्रचंड कल्पनाशक्ती आहे. या कल्पनाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तर पुढच्या काळात रोजगार स्टार्टअपच्या माध्यमातून होईल. राज्याने डॉ. माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिली स्टार्टअप पॉलिसी तयार झाली. त्यांच्या स्टार्ट पॉलिसीमुळे राज्यात सर्वात अधिक स्टार्टअप सुरू झाले. ऍग्री बिझनेसमध्ये सर्वाधिक स्टार्टअप झाले. आज शेतातील माल थेट जागतिक पातळीवर जाउ लागला, सर्वाधीक रोजगार निर्माण झाला याचे श्रेय डॉ. माशेलकर यांच्याकडे जाते.
डॉ. माशेलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आयुष्यात अनेक पारितोषिक मिळाली आहेत. परंतु हा अटल पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. युगपुरूष अटलजींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचे महत्वच वेगळे आहे. अटलजींचे प्रेरणादायी नेतृत्व, त्यांचे मार्गदर्शन मला सीएसआयआरमध्ये असताना मिळाले. सीएसआयआर चे नेतृत्व करताना त्यांनी मला स्वातंत्र्य दिले, पाठींबा दिला. त्यामुळे सीएसआयआर संस्था जगामध्ये दहा क्रमांकांमध्ये आलो. यावेळी डॉ. माशेलकर यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या आठवणी सांगितल्या. परंतू शिक्षकांना प्रतिष्ठा देण्याबाबत त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले, ते पुर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

जगात काहीही घडले तरी पुणेकर त्याचे नाते पुण्याशी जोडतो – गिरीष बापट
गिरीष बापट म्हणाले, जगात काहीही घडले तरी आम्ही त्याचे नाते पुण्याशी जोडतो. बायडेन अध्यक्ष झाले, तर म्हणतात ते पुण्याचेच होते, पुर्वीचे भिडे, इंदिरा गांधी येथील हुजूरपागा शाळेत शिकल्याचे सांगतात. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले , त्यांचे काका पुण्यातच राहातात, असे पुणेकर आहेत, डॉ. माशेलकर हे गोव्याचे असले तरी त्यांची नाळ पुण्याशी जोडले आहे. त्यांच्या हातून उत्तमोत्तम कार्य घडेल, ही शुभेच्छा.

मी परत कोल्हापूरला जाणार – चंद्रकांत पाटी
खासदार गिरीष बापट यांच्या भाषणाचा आधार घेत चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे असे आहे की पुण्यात सेटल व्हावे वाटते. पण मी परत जाणार. विशेषत: विरोधकांना सांगा, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उठला. महापौर मुरलीधर मोहोळ हे सर्व विषयांना चांगला न्याय देतात. कोरोना काळातही टीका होत असताना संयमाने परिस्थिती हाताळली. मागील तीन वर्षांपासून ते उत्तमोत्तम व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार देतात.