पेट्रोलच्या शंभरीवरून अजित पवारांनी साधला पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले…

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे छायाचित्र असल्याचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पेट्रोल 100 रुपयांच्या वर गेल्याने पेट्रोल भरणाऱ्यांनी त्या फोटोकडे पाहिल्यानंतर आता कशी तुझी जिरवली, घाल आत्ता १०० रूपयांचे पेट्रोल असेच ते (पंतप्रधान) म्हणतात, असा उपरोधिक टोमणा त्यांनी यावेळी मारला.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तमप्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा फोटो लावण्याचा नियम केला आहे. पेट्रोल भरताना त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल या पवार यांनी पंतप्रधानांबाबत केलल्या टिपणीवर उपस्थिांमध्ये हशा पिकला.