बारामती नगरपालिकेच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक विसर्जन; २८ कृत्रिम जलकुंभात ४७५० गणेश मूर्तींचे विसर्जन

कोरोनाचे संकट लवकर टळून सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना गणेश भक्तांच्या वतीने गणरायाला करण्यात आली. बारामती शहर व परिसरात अत्यंत साध्या पध्दतीने ‌गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे साध्या पध्दतीने व उत्साही वातावरणात विसर्जन करण्यात आले. शहरातील ४,७५० गणेश मूर्तींचे विसर्जन बारामती नगरपालिकेच्या (Baramati Municipality) वतीने उभारण्यात आलेल्या २८ कृत्रिम जलकुंभात करण्यात आले. तसेच १२ फिरत्या रथातून गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले.

  कोरोनामुळे बारामती शहर व‌‌ परीसरात अत्यंत साध्या पध्दतीने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. कोणताही डामडौल अथवा मिरवणुक‌‌ न काढता गणरायाची प्रतिष्ठापना सार्वजनिक ठिकाणी व घरांमध्ये करण्यात आली होती. रविवारी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता सुरू ‌झालेला विसर्जन सोहळा रात्री दहा वाजता संपला. यानंतर नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम जलकुंभ‌ फिरत्या रथातून संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे एका विहिरीमध्ये विसर्जन करण्यात आले.

  बारामती शहरात गणेश विसर्जन मिरवणूक न‌‌ काढता बारामती नगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार नागरिकांनी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंभामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. यासाठी बारामती नगरपालिकेच्या वतीने शहरातील २८ ठिकाणी कृत्रिम जलकुंभाची निर्मिती केली होती. तर १२ फिरत्या रथांची सोय केली होती. या फिरत्या रथांमध्ये गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.

  बारामती नगरपालिकेचा हा पर्यावरण पूरक विसर्जनाचा पॅटर्न आदर्शवत ठरला आहे. नागरिकांनी गणेश मुर्ती शहरातील नीरा डावा कालवा अथवा क-हा नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये करू नये, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने गणेश भक्तांना करण्यात आले होते. बारामती नगरपालिकेच्या या आवाहनाला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणेश मूर्तींचे कृत्रिम जलकुंभा मध्ये विसर्जन केले. या जलकुंभा लगतच निर्माल्य संकलनासाठी कुंड ठेवण्यात आले होते.

  बारामती नगरपालिकेची ५० पथके मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी तैनात केली होती. या पथकात सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश ‌होता.हे कर्मचारी प्रत्येक जलकुंभाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

  मुख्याधिकारी महेश रोकडे, उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे यांच्यासह आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष रोकडे आदींसह नगरपालिकेचे विविध खात्यांचे प्रमुख स्वतः दिवसभर जलकुंभाच्या ठिकाणी थांबून कर्मचाऱ्यांना सूचना करत होते. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  कोरोनाचे संकट लवकर टळून सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना गणेश भक्तांच्या वतीने गणरायाला करण्यात आली. बारामती शहर व परिसरात अत्यंत साध्या पध्दतीने ‌गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील शांततेत व साध्या पध्दतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.