माणूस मेला तरी आमच्याकडे पैसे नाही… असे म्हणत; पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील सुरक्षारक्षक आणि आरोग्य कर्मचारी भिडले

कोरोना संकटाच्या काळात जीवाची बाजी लावून काम केल्यानंतर देखील महापालिका व राज्य सरकार आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. व थकीत पगारासाठी दोन तीन वेळा आंदोलन करून देखील तसेच राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडून या कर्मचाऱ्यांबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

पुणे: शहरातील जम्बो रुग्णालयातील शुक्रवारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्याचे काम सुरु असतानाच,  कर्मचारी व सुरक्षारक्षक यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. अद्याप तरी या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही. परंतू, हाणामारीच्या घटनेमुळे जम्बो कोविडमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

कोरोना संकटाच्या काळात जीवाची बाजी लावून काम केल्यानंतर देखील महापालिका व राज्य सरकार आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. व थकीत पगारासाठी दोन तीन वेळा आंदोलन करून देखील तसेच राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडून या कर्मचाऱ्यांबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र शुक्रवारी थकीत पगाराचे वाटप सुरु असताना आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षारक्षक काही गोष्टीवरून वादावादी झाली.त्यानंतर याचे रूपांतर हाणामारी होऊन एकमेकांना भिडले.

माणूस मेला तरी आमच्याकडे त्यांची माती करण्यासाठी पैसे नाही…
माणूस मेला तरी आमच्याकडे त्यांची माती करण्यासाठी पैसे नाहीत. सप्टेंबरपासून पगार मिळालेले नाहीत. आमचा परिवार कसा चालणार? पगार मागितला तर आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली जाते. पालिकेने आमच्यासाठी दिलेला १२ हजारांचा बोनसही एजन्सीने लंपास केला. नर्सिंगचे काम करणा-या कर्मचा-यांचा मानसिक छळ करुन त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा गंभीर आरोप जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सहा महिन्यांच्या करारावर नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना३५ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले होते. परंतु, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निम्माच पगार देण्यात आला. तर, नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरमहिन्याला अवघे दहा ते पंधरा हजार रुपये हातामध्ये टेकवले जात आहेत. पूर्ण पगाराची मागणी केल्यानंतर दमदाटी, शिविगाळ केली जात असून याबाबत आवाज उठविताच रुग्णालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर काढून टाकण्यात येते.

रुग्णालय सुरुवातीपासूनच पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. येथील वाद अद्याप मिटलेले नाही, सुरुवातीला अपुऱ्या सुविधा, रुग्णांच्या उपचारात हेळसांड, त्यानंतर महिलारूग्ण गायब झाल्याने रुग्णालय चर्चेत आले होते.