इंदापूर तालुक्यातील बाभुळगावच्या शेतकऱ्याची डाळिंब परदेशात निर्यात

  इंदापूर / शैलेश काटे : ना त्याच्या जिद्दीआड आले बदलते हवामान, ना लॉकडाऊनच्या भिंती…ढासळते बाजारभाव, इतर शेतकऱ्यांच्या मनातील अस्थिरता ही त्याला विचलित करु शकली नाही…सा-या नकारात्मक बाबींवर मात करत त्याने निर्यातक्षम डाळिंब (Pomegranate) उत्पादनाचा गतवर्षीचा लौकिक या ही वर्षी कायम ठेवला. तो देखील अधिक सरसपणे…

  कष्टाची व आत्मविश्वासाची ही गाथा आहे. बाभुळगाव (ता. इंदापूर) येथील दीपक आबासाहेब गुरगुडे या उच्चशिक्षित डाळिंब उत्पादक शेतक-याची. यंदाच्या वर्षी ही त्यांची चौथा बहारातील भगवा जातीची डाळिंबे प्रतिकिलोस १३१ रुपयांचा दिमाखदार दर मिळवत बांगलादेशात रवाना झाली आहेत. मागील वर्षी ही प्रतिकिलोस १०१ रुपये दर मिळवत ती तेथेच निर्यात झाली होती. विषम परिस्थितीत गुरगुडे यांनी मिळवलेले दैदिप्यमान यश इतर शेतक-यांना प्रेरणा देणारे आहे.

  दीपक गुरगुडे हे शेतकरी कुटुंबातील उमदे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शिक्षण घेऊन ‘साहेब’ बनावे ही त्यांच्या आई वडिलांची इच्छा. तिला मान देवून दीपक यांनी एम.ए.बीपीएडपर्यंत शिक्षण घेतले. मात्र साहेब न होता भीमनदीच्या तीरावर असणारी शेती करावी, असा निर्णय त्यांनी घेतला. कर्नाला येथे शास्त्रोक्त दूधनिर्मितीचे शिक्षण घेतले. कोइमतूर येथे ऊस पैदास केंद्राचे प्रशिक्षण घेतले. पंतप्रधान कौशल्य व उद्योजकता विकास योजनेंतंर्गत इंदापूर व बाभूळगाव येथे घेतलेल्या प्रशिक्षणामुळे शेतीकडे जाणारी त्यांची वाट समृध्द झाली.

  मागील वर्षी त्यांनी एकूण क्षेत्रापैकी साडेचार एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली होती. सेंद्रिय व रासायनिक खतांचा एकात्मिक वापर, प्रकाश सापळ्यांचा योग्य वापर व जीवामृत, शेण व सरकी पेंड स्लरी, रोग-कीड नियंत्रणासाठी फवारणी यावर भर दिला. ६५ टन उत्पादन झाले. त्यापैकी ४६ टन डाळिंब बांगलादेशात निर्यात झाले. त्यामुळे उत्साह द्विगुणीत झाला. यंदा अकरा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय दीपक यांनी घेतला.

  गेल्यावर्षी प्रमाणेच बहर व्यवस्थापन, पीक, पाणी व खत नियोजन केले. मोठ्या बाजारपेठेचा तुलनात्मक अभ्यास केला. साडेचार एकरावरील डाळिंबाची तोडणी झाली. यावर्षी खर्च वजा जाता ४७ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. चालू हंगामात पन्नास टनापर्यंत उत्पादन मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

  डाळिंबावर रोग पडले, विशेषतः तेल्याचा प्रादुर्भाव झाला तर शेतकरी धास्तावून जातात. झाडे उपसून टाकतात. तसे न करता झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा एकात्मिक वापर करण्यावर भर द्यावा. डस्टिंग व ब्ल्यूकाॅपरचा वापर केल्यास तेल्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. मात्र, शेती करताना पहिल्यांदा मनाची सकारात्मक तयारी करणे अत्यंत महत्वाचे आहे, असे ‘नवराष्ट्र’ शी बोलताना दीपक गुरगुडे यांनी सांगितले.