पत्ता विचारण्याचा बहाणा करून महिलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन लाखाचे दागिने जप्त

बारामती शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचा पाठलाग करुन त्यांचेकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरी करुन नेले . पोलीस कोठडीतील आरोपी चंद्र्कांत लक्ष्मण लोखंडे याचेकडून तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण तीन लाख रुपये किंमतीचे एकूण सहा तोळे वजनाची तीन वेगवेगळी गंठणे हस्तगत करुन बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

बारामती: महिलांचा पाठलाग करून त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांचे दागिने लुटणा-या टोळीला बारामती शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीतील तीन लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत . पुणे ग्रामीण जिल्ह्यात महिलांचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरी करण्याचे गुन्हे होत असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनला गुन्हे उघडकीस करण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान वडगावं निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ४९८/२०२०भादवी कलम३९२,३४ या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी अक्षय विलास खोमणे (वय २४ रा.कोर्‍हाळे बु. ता.बारामती) याने बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९६/२०२० भा.द.वी. कलम३९२,३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यात वर्ग करुन घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने व साथीदार चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२ ,सध्या रा. निरा ता.पुरंदर ) व राहूल पांडूरंंग तांबे( वय २८ ,रा.जेऊर ता.पुरंदर) या तिघांनी मिळून बारामती शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचा पाठलाग करुन त्यांचेकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरी करुन नेले . पोलीस कोठडीतील आरोपी चंद्र्कांत लक्ष्मण लोखंडे याचेकडून तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण तीन लाख रुपये किंमतीचे एकूण सहा तोळे वजनाची तीन वेगवेगळी गंठणे हस्तगत करुन बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत असून अटक आरोपी याने पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावंक, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस नाईक रुपेश साळुंखे, पो.कॉ.सुहास लाटणे, दशरथ इंगवले,बंडू कोठे, योगेश कुलकर्णी,अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख, अशोक शिंदे यांनी केली.