नोकरदारांची गैरसोय टाळण्यासाठी ‘डेक्कन’ क्वीनचे पिंपरी चिंचवड मध्ये थांबे वाढवा: विलास लांडे

डेक्कन क्वीनचे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी येथे थांबे वाढवा अथवा नोकरदारांना सोयीची सिंहगड एक्सप्रेस सुरू करा अशी मागणी, माजी आमदार विलास लांडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार लांडे यांनी सांगितले.

    पिंपरी: पिंपरी व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदारांची गैरसोय टाळण्यासाठी डेक्कन क्वीन सुरू करण्यात आली. मात्र, तिचे शहरात थांबे कमी आहेत. त्यामुळे पिंपरीतील नोकरदारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेकांना लोणावळा तर काहींना पुण्यात बसायला जायला लागत आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनचे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी येथे थांबे वाढवा अथवा नोकरदारांना सोयीची सिंहगड एक्सप्रेस सुरू करा अशी मागणी, माजी आमदार विलास लांडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार लांडे यांनी सांगितले.

    माजी आमदार लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की, पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन शुक्रवारी (दि. २५) पासून सुरू झाली. डेक्कन क्वीनचे पिंपरी चिंचवड मध्ये कमी थांबे आहेत. पुण्यावरून निघाल्यानंतर थेट लोणावळा येथे पहिला थांबा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील नोकरदारांना मुंबईला जाण्याकरिता पुण्याला किंवा लोणावळ्याला जावे लागत आहे. मुंबईवरून येताना डेक्कन क्वीन पुणे येथे थांबते. तेथील थांब्यावर उतरून पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना पुन्हा माघारी यावे लागत आहे. नोकरीवर वेळेत जाण्याची गडबड, त्यामध्ये अशी असलेली गैरसोय, त्यामुळे नोकरदारांनी नापसंती व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार पिंपरी व चिंचवड येथील थांब्याला सुमारे एक हजार प्रवाशांची नोंद आहे. प्रवाशांची संख्या अधिक असतानाही डेक्कन क्वीनला थांबा नसल्यामुळे नोकरदार वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.

    पिंपरी चिंचवड वरून मुंबईला जाणाऱ्या नोकरदारांची संख्या दीड हजारावर आहे. कोरोनाच्या काळात डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस बंद असल्यामुळे अधिकचे पैसे खर्च करून पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नोकरदार प्रवास करत होते. सध्या डेक्कन क्वीन सुरू केली आहे. त्याचे थांबे पिंपरी-चिंचवड शहरात करावे. अन्यथा नोकरदारांना सोयीची असणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु करावी, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

    तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून देखील रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून नोकरदारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.