नागरवस्ती विभागाच्या बक्षीस योजनेस विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ द्या ; उपमहापौर घुले यांची प्रशासनाला सूचना

कोरोनामुळे महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे शिफारस पत्र मिळाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा झालेली नाहीत. कागदपत्रे मिळविण्यास वेळ लागत आहे. महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु होण्याची शक्यता आहे.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील इतर कल्याणकारी योजने अंतर्गंत दहावी आणि बारावीच्या ८० टक्के गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना बक्षिस रक्कम देण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्याची सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. कोरोनामुळे महाविद्यालये सुरु नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करताना अडचणी येतात. त्यामुळे मुदतवाढ द्यावी अशी सूचना त्यांनी केली.

    याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे दहावी, बारावीच्या ८० टक्क्यांहून गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येते. या योजनेसाठी विहीत नमुन्यातील फॉर्म, रहिवासी दाखला,आधार कार्ड, गुणपत्रिका, विद्यार्थ्याचे किंवा पालकाचे राष्ट्रीयीकृत बॅकेतील खाते व पास बुकची झेरॉक्स, प्रवेश घेतलेल्या संस्थेतील मुख्याध्यापक / प्राचार्य यांची शिफारस इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात. या योजनेची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२१आहे.

    कोरोनामुळे महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे शिफारस पत्र मिळाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा झालेली नाहीत. कागदपत्रे मिळविण्यास वेळ लागत आहे. महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु होण्याची शक्यता आहे. बक्षीस योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. याची दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोना काळात बक्षीस योजनेचा विद्यार्थ्यांला पुढील शिक्षणासाठी मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे या योजनेचा शहरातील जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीकोनातून योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली आहे.