अहमदाबादचा पोलीस आयुक्त बोलतोय, अशी बतावणी करत पोलीसांकडूनच २४ हजार उकळले

मी अहमदाबादचा पोलीस आयुक्त विजयसिंग बोलतोय, मला पिस्तुलच्या अवैध विक्रीबाबत माहिती द्यायची आहे, अशी बतावणी करत त्याने कृष्ण प्रकाश यांचा मोबाईल क्रमांक मागितला. त्यानुसार, त्याला क्रमांक देण्यात आला. त्यानंतर त्याने पुन्हा कॉल करून मी पोलीस आयुक्तांना २५ वेळा कॉल केला, मात्र, ते माझा कॉल उचलत नाहीत, अशी मघलाशी केली.

    पिंपरी : अहमदाबादचा पोलीस आयुक्त बोलतोय, पिस्तुलच्या अवैध विक्रीबाबत माहिती द्यायची असल्याची बतावणी करून एकाने चक्क पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडूनच २४ हजार रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या तोतयाला पोलीसांनी मुंबईतून जेरबंद केले. हा प्रकार ८ ते २८ डिसेंबर रोजी चिंचवड येथे घडला.

    खलीलुल्लाह अयनुल्ला खान (वय ४०, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे अटक केलेल्या तोतया पोलीस आयुक्ताचे नाव आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी खान याने ८ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत वेळोवेळी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात थेट पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यालयीन दुरध्वनी क्रमांकांवर तसेच नियंत्रण कक्षात कॉल केले. मी अहमदाबादचा पोलीस आयुक्त विजयसिंग बोलतोय, मला पिस्तुलच्या अवैध विक्रीबाबत माहिती द्यायची आहे, अशी बतावणी करत त्याने कृष्ण प्रकाश यांचा मोबाईल क्रमांक मागितला. त्यानुसार, त्याला क्रमांक देण्यात आला. त्यानंतर त्याने पुन्हा कॉल करून मी पोलीस आयुक्तांना २५ वेळा कॉल केला, मात्र, ते माझा कॉल उचलत नाहीत, अशी मघलाशी केली.

    तसेच संबंधित पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक मागून घेतले. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, फौजदार प्रदीपसिंग सिसोदे यांना त्याने कॉल केले. तुमच्या हद्दीत चार-पाच पिस्तुलची विक्री होणार आहे, अशी माहिती देऊन विश्वास संपादन करण्यासाठी फोटो पाठवले. त्याससाठी १५ हजाराची मागणी केली. त्याने खलीलुल्लाह खान या नावाने मुंबईतील बँक खात्याची माहिती पाठवली. याचा संशय आल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माहिती देऊन पथक तयार केले. गोरेगाव येथे सापळा रचण्यात आला. त्याला पेटीएम आणि गुगल पे द्वारे २४ हजार रूपये पाठवले. बोलण्यात गुंतवून त्याला जेरबंद करण्यात आले. खान याने यापूर्वी मुंबईत बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले असून मुंबईत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.