प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकाला धमकावून मागितली १५ लाखांची खंडणी

ढमाले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांची कोंढव्यातील गोकुळ हॉटेल समोर बहुमजली बांधकाम साईटचे काम सुरू आहे. काम पुर्ण झालेल्या बांधकामाच्या साईटवरील बहुतांश फ्लॅटचा ताबा त्यांनी दिलेला आहे. काही सदस्यांना ताबा द्यायचा आहे. फ्लॅट दिलेल्या सदस्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे.

    पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकाला सोसायटीमधील अॅमिनिटीजचा ताबा न दिल्यावरून धमकावत १५ लाखांची खंडणी मागून गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक युवराज सिताराम ढमाले (वय ४१, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रवीलाल देवजीलाल प्रजापती (वय ४०), जितू प्रजापती (रा. कोंढवा) यांच्यासह तिघांवर भादवी कलम ३८४, ३८६, ३८७ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढमाले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांची कोंढव्यातील गोकुळ हॉटेल समोर बहुमजली बांधकाम साईटचे काम सुरू आहे. काम पुर्ण झालेल्या बांधकामाच्या साईटवरील बहुतांश फ्लॅटचा ताबा त्यांनी दिलेला आहे. काही सदस्यांना ताबा द्यायचा आहे. फ्लॅट दिलेल्या सदस्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे.

    आरोपी रविलाल देवजीभाई प्रजापती यांना देखील फ्लॅटचा ताबा दिलेला आहे. तरीदेखील प्रजापती याने तक्रारदार ढमाले यांना बोलवून सदस्यांची मिटींग बोलावली. तेथे कॉमन ॲमिनिटीजचा ताबा अजुन आम्हाला दिला नाही असे म्हणत वाद घातला. सोसायटीच्या सदस्यांना भडकवुन तुमच्याविरुद्ध तक्रार करायला भाग पाडु, तुमची बदनामी करू अशी धमकी त्यांना दिली. तसेच १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास गाडीखाली चिरडुन टाकण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर ढमाले यांनी कोंढवा पोलीसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी तक्रारीची चौकशीकरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.