उत्साही वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ‘बाप्पांना’ निरोप

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्सव मंडपात श्रींची आरती झाल्यानंतर विसर्जनाला सुरुवात झाली. 'मोरया.. मोरया'च्या जयघोषात मूर्ती विसर्जन कुंडांकडे दाखल झाली. तर 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणरायांना निरोप दिला.

    पुणे: मोरया… मोरया’ चा जयघोष, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भंडाऱ्यांची उधळण या उत्साहपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ‘बाप्पांना’ निरोप देण्यात आला. शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायांचे विसर्जन दुपारी करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्सव मंडपात श्रींची आरती झाल्यानंतर विसर्जनाला सुरुवात झाली.

    ‘मोरया.. मोरया’च्या जयघोषात मूर्ती विसर्जन कुंडांकडे दाखल झाली. तर ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणरायांना निरोप दिला. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे यांसह मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. अखंडपणे चौघड्याचे वादन सुरू होते. यासह आरतीच्या वेळी मंदिरात कार्यकर्त्यांनी शंखनाद केला.