अखेर शेतकऱ्यांचा सेझ परतावा प्रश्न निकाली : शिवाजीराव आढळराव पाटील

खेड विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) स्थापन केलेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड (KDL) या कंपनीतून भारत फोर्ज ही कंपनी बाहेर पडल्याने यातील १४९ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

    खेड (पुणे) : खेड विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) स्थापन केलेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड (KDL) या कंपनीतून भारत फोर्ज ही कंपनी बाहेर पडल्याने यातील १४९ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवडाभरात याबाबत अंतिम अधिसूचना निघणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी सांगितल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिली.

    खेड सेझसाठी खेड व शिरूर तालुक्यातील सुमारे पाच हजार एकर जमिनीवर शिक्के टाकण्यात आले होते. मात्र, तत्कालीन शासनाने जाहीर केलेला मोबदला अतिशय तुटपुंजा असल्याने जमिनींच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, तसेच संपादनावेळी शेतकऱ्यांना कबूल केल्याप्रमाणे १५ टक्के जमिनीचा परतावा देण्यात यावा, यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.

    आढळराव पाटील व माजी आमदार सुरेश गोरे यांच्यासमवेत शेतकरी शिष्टमंडळ व उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका संपन्न झाल्या. शिवसेनेच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रत्येकवेळी सेझबाधित शेतकऱ्यांची बाजू सक्षमपणे मांडण्यात आली होती.

    आढळराव पाटील म्हणाले की, सेझबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नुकतीच मंत्रालयात सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या या भेटीवेळी मंत्री महोदयांनी भारत फोर्ज कंपनी केडीएलमधून बाहेर पडत असून, याबाबतची अंतिम अधिसूचना येत्या आठवडाभरात काढणार असल्याचे सांगितले. केडीएल कंपनीचे मालक हे शेतकरी असून केडीएल व भारत फोर्ज या जागांचे एकत्रित मालक होते. मात्र, भारत फोर्ज कंपनी यामधून बाहेर पडल्याने या जागांवर केडीएल या शेतकऱ्यांच्या कंपनीकडे १४९ हेक्टर जागेची पूर्ण मालकी राहणार आहे.

    या जागांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा याकरता एमआयडीसी व अनेक बड्या उद्योगसमूहांशी माझी चर्चा सुरु आहे. शेतकरी हितासाठी शिवसेनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व उद्योगमंत्रालयाची यशस्वी शिष्टाई कामी आल्याने समाधानाची भावना आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. या भेटीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे आदी उपस्थित होते.