अबब! वाहतूक शाखेच्या बदल्या “पॅटर्न”ला कंटाळून पोलीस निरीक्षकाचा थेट नियंत्रण कक्षात फोन; दिला आत्मदहन करण्याचा इशारा

पुणे पोलीस दलाच्या कारभाराला कंटाळून एका व्यक्तीने आयुक्तालयाचे गेटसमोरच स्वत:ला पेटवून घेत आत प्रवेश केला होता. हे प्रकरण "पूर्ण" मिटलेले नसताना आता आपल्याच खात्याच्या कारभाराला कंटाळून एका पोलिस निरीक्षकानेच इशारा दिला आहे. त्यामुळे अतिवरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. हा फोन आल्यानंतर दिवसभर आयुक्तालयात धावपळ उडाली होती. निरीक्षक आयुक्तालयात येऊन आत्मदहन करतील या भीतीने आयुक्तालय आणि त्या निरीक्षकाच्या घरी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

    पुणे : पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग सध्या एक ना अनेक कारणांनी चर्चेत असून, चक्क आज एका पोलीस निरीक्षकानीच नियंत्रण कक्षाला फोन करत आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

    पुणे पोलीस दलाच्या कारभाराला कंटाळून एका व्यक्तीने आयुक्तालयाचे गेटसमोरच स्वत:ला पेटवून घेत आत प्रवेश केला होता. हे प्रकरण “पूर्ण” मिटलेले नसताना आता आपल्याच खात्याच्या कारभाराला कंटाळून एका पोलिस निरीक्षकानेच इशारा दिला आहे. त्यामुळे अतिवरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. हा फोन आल्यानंतर दिवसभर आयुक्तालयात धावपळ उडाली होती. निरीक्षक आयुक्तालयात येऊन आत्मदहन करतील या भीतीने आयुक्तालय आणि त्या निरीक्षकाच्या घरी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

    संबंधित पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेत नेमणुकीस आहेत. त्यांची गेल्या काही दिवसांत दोन ते तीन वेळा बदली झाली आहे. त्यामुळे संबंधित निरीक्षकाना नैराश्य आले आहे. या सततच्या बदली पॅटर्नला वैतागून शेवटी त्यांनी गुरुवारी सकाळी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि थेट आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियंत्रण कक्षातून ती माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हालचाली केल्या. यापूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे पोलिस आयुक्तालयात पुन्हा अशी घटना घडू नये, म्हणून या फोननंतर बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच, संबंधित निरीक्षक राहत असलेल्या इमारतीत देखील सुरक्षा वाढविण्यात आली. त्याना दुपारपर्यंत निरीक्षकाचे समुपदेशन करण्यात आले. तसेच, त्यांना नोटीस बजावून असे कृत्य न करण्याची ताकीद देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.