अन्न व औषध विभागाच्या स्थलांतरास खासदार बापट यांचा विरोध

गुरुवार पेठेत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाच्या कार्यालयाचे औंधला झालेल्या स्थलांतरामुळे विक्रेत्यांसह व्यावसायिकांची गैरसोय झाली आहे. सध्या नव्याने औंध येथील कार्यालय मोशी येथे पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराच्या विरुद्ध दिशेला स्थलांतरीत करण्याबाबत प्रशासनाची कार्यवाही सुरु असल्याचे समजते.

    पुणे : अन्न व औषध विभागाची प्रशासकीय कार्यालये मोशी येथे हलविण्यास खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शविला असून ही कार्यालये शहराच्या मध्यवर्ती परिसरात हलवावीत. अशी मागणी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.

    पालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही बापट यांनी गुरूवारी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.त्यात म्हटले आहे की, गुरुवार पेठेत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाच्या कार्यालयाचे औंधला झालेल्या स्थलांतरामुळे विक्रेत्यांसह व्यावसायिकांची गैरसोय झाली आहे. सध्या नव्याने औंध येथील कार्यालय मोशी येथे पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराच्या विरुद्ध दिशेला स्थलांतरीत करण्याबाबत प्रशासनाची कार्यवाही सुरु असल्याचे समजते.

    पुणे शहरात मोठ्या प्रमाणात असलेले छोटे मोठे खाद्य विक्रेते, हॉटेल, ढाबे, हातगाड्या त्यांना आवश्यक असणारे परवाने तसेच त्यांची तपासणी व आपल्या विभागात असणाऱ्या विविध कामानिमित्त नागरिकांना वेळोवेळी औंध कार्यालयात ये-जा करावे लागते. त्यामुळे मोशी येथे सदर प्रशासकीय कार्यालय स्थलांतरीत झाल्यास नागरिकांचा आर्थिक व वेळेचा अपव्यय होणार असून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रयोगशाळा आणि गोडाऊन वगळता अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोणतेही प्रशासकीय कार्यालय मोशी येथे स्थलांतरीत करू नये अशी नागरिकांची मागणी आहे.

    या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रशासकीय कार्यालये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणे आवश्यक आहे. तरी शहरातील लाखो व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रशासकीय कार्यालये मोशी येथे स्थलांतरीत न करता पुणे शहरात मध्यवर्ती भागातच सुरु ठेवावीत असे बापट यांनी निवेदनात नमूद केले.