‘फी माफीसाठी’ विद्यार्थ्याने स्वतःला जखमी करून घेत मारहाणीचा केला कांगावा ; मात्र सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग

दरम्यान यानंतर महाविद्यालया  प्रशासनाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र असे काही नसून त्या विद्यार्थ्यांने स्वतः दरवाज्यावर धडक मारली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाल्याने संपूर्ण प्रकार समोर आला.

    पिंपरी: ‘फी कमी करावी’ यासाठी विद्यार्थ्यांने कॉलेजमधील काचेच्या दरवाज्यावर धडक घेतल्याने काच तुटून विद्यार्थी व शिपाई कर्मचारी जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये घडला आहे. याबाबत कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

    पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील प्राचार्य कक्षामध्ये सकाळी अकरा वाजता एक विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत आला. यावेळी त्याने प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्यासोबत शुल्क कमी करावे यासाठी वाद घातला. प्राचार्य यांनी त्यांला फी कमी करण्याचे अधिकार मला नाहीत असे सांगितले. तसेच रयत शिक्षण संस्था सातारा व महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार तुम्हाला फी भरावी लागेल. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ज्या बाबींचा वापर झाला नाही त्या बाबींची फी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात माफ करावी. असे असताना ती सवलत तुम्हाला लागू आहे. मात्र उर्वरित फी तुम्हाला भरावी लागले, ती तुम्ही टप्याटप्याऩे भरू शकता असे प्राचार्यांनी सांगितले.

    मात्र, यापैकी त्या विद्यार्थ्याला काहीही मान्य नसल्याचा दावा शाळा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू असताना विद्यार्थ्यांने दरवाज्याच्या काचेवर जोरात धडक मारली. त्यानंतर त्यांने दुसरी धडक मारली असता काच फूटून तो विद्यार्थी जखमी झाला. तसेच काच फुटल्याने दरवाज्याजवळ असलेला शिपाई सुरेश देसाई देखील जखमी झाला. त्यानंतर खाली पडलेला काचेचा तुकडा घेऊन हा विद्यार्थी बाहेर गेला.

    त्याने काही गैरकृत्य करू नये यासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून एका खोलीत बंद केले. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान यानंतर महाविद्यालया  प्रशासनाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र असे काही नसून त्या विद्यार्थ्यांने स्वतः दरवाज्यावर धडक मारली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाल्याने संपूर्ण प्रकार समोर आला. शाळा प्रशासनाने याबाबत पोलिसात तक्रार केली आहे.